अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
सात जणांच्या टोळक्याने दोघांवर लोखंडी कोयता व चाकूने हल्ला करून दोघांचा खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी रात्री 8:30 च्या सुमारास नवनागापुरातील चेतना कॉलनीमध्ये घडली. मारहाणीत विशाल जालिंदर काटे व त्यांचे मित्र अनिकेत सोमवंशी (रा. नवनागापूर, अहिल्यानगर) जखमी झाले आहेत. जखमी विशाल काटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विठ्ठल उर्फ भोर्या नवनाथ काळे, महेश बाबासाहेब आरू, अभि भोसले, जॉय सोनवणे, प्रतिक पवार, गणेश नवनाथ काळे आणि सोनू काळे (सर्व रा. नवनागापूर) यांच्याविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी विशाल काटे हे एमआयडीसी येथून घरी परतत असताना चेतना कॉलनीजवळ अनिकेत सोमवंशी याच्या पानटपरीवर थांबले होते. तेव्हा संशयित आरोपींनी गैर कायद्याची मंडळी जमवून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. चाकू व लोखंडी कोयत्याने हल्ला करून विशाल आणि अनिकेतला गंभीर जखमी केले. तसेच जिवे मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी संपत भोसले, सहायक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पथकासह भेट दिली. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.