मुंबई
परतीचा पावसाचा कोकणसह पश्चिम महाराष्ट्राला मोठा फटका बसला. अतिवृष्टीमुळे सांगली, सोलापुरातील खरीप पिके, भाजीपाल्यासह कोकणातील भातशेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता तरी घराबाहेर पडावे आणि शेताच्या बांधांवर जाऊन शेतकऱ्याची विचारपूस करावी अशी साद राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घातली आहे.
मनसेचे प्रवक्ते आणि नेते बाळा नांदगावकर यांनी ट्विटरवरुन यासंदर्भातील आवाहन मुख्यमंत्र्यांना केले आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, आम्ही तुमच्यावर थेट टीका करण्याचे टाळत आलो पण आता शेतकऱ्यांचे अतिवृष्टीमुळे झालेले हाल ऑनलाइन बघता येणार नाही. थेट बांधावर जाऊन ते अश्रू पुसा व त्यांना त्वरित आर्थिक मदत द्या. अन्यथा लोकांचा ठाकरे नावावरील विश्वास उडेल.
याच ट्विटबरोबर बाळा नांदगावकर यांनी अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचल्याने हातचे पिक गेल्यामुळे हवालदील होऊन रडणाऱ्या शेतकऱ्यांचा व्हिडीओही पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री कार्यालय, मनसेबरोबरच काही वृत्तवाहिन्यांनाही टॅग केले आहे.