Saturday, April 4, 2026
HomeUncategorizedShrigonda : कोकणगाव खूनप्रकरणी पती-पत्नी जेरबंद

Shrigonda : कोकणगाव खूनप्रकरणी पती-पत्नी जेरबंद

नगरच्या स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी || जुन्या वादातून केली होती हत्या

अहिल्यानगर/ श्रीगोंदा |प्रतिनिधी | Shrigonda

श्रीगोंदा तालुक्यातील कोकणगाव येथे जुन्या वादातून झालेल्या खुनाच्या गुन्ह्यातील मुख्य संशयित आरोपी पती-पत्नीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. महेश किरास चव्हाण (वय 25) व शैला महेश चव्हाण (वय 27, दोघे रा. आढळगाव, ता. श्रीगोंदा) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

- Advertisement -

दया भाऊसाहेब राजपूत (रा. कोकणगाव) यांनी यासंदर्भात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादीनुसार, 16 जानेवारी रोजी रात्री 10 ते 10.30 वाजण्याच्या सुमारास त्यांचा मुलगा शुभम याचे दुपारी झालेल्या भांडणाच्या कारणावरून महेश चव्हाण याच्यासह इतर साथीदारांनी फिर्यादीच्या राहत्या घरासमोर येऊन गोंधळ घातला. जमाव जमवून शुभम यास शिवीगाळ व दमदाटी करत मारहाण केली. दरम्यान, हा प्रकार थांबविण्यासाठी फिर्यादीचे पती भाऊसाहेब नामदेव राजपूत मध्यस्थी करण्यासाठी पुढे आले असता महेश चव्हाण याने हातातील धारदार हत्याराने त्यांच्यावर वार केला. गंभीर जखमी अवस्थेत त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला संशयित आरोपींना अटक करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव गुट्टे व समीर अभंग तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, फुरकान शेख, अमृत आढाव, योगेश कर्डिले, प्रशांत राठोड, सोनाली भागवत आणि चालक भगवान धुळे यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. तांत्रिक व माहितीच्या आधारे 18 फेब्रुवारी रोजी संशयित आरोपी महेश किरास चव्हाण हा जामखेड रस्त्यावरील हत्तीबारव परिसरात असल्याची माहिती मिळाली.

पथकाने सापळा रचून शिताफीने महेश चव्हाण व त्याची पत्नी शैला चव्हाण यांना ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दरम्यान, महेश चव्हाण याच्याविरूध्द यापूर्वीही श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामध्ये दरोडा, चोरी व घरफोडीचे गुन्हे समाविष्ट आहेत.

ताज्या बातम्या

संपादकीय : ०४ एप्रिल २०२६ – बंगालमधील झुंडशाही

0
पश्चिम बंगालमधील कालीचक येथे घडलेली घटना लोकशाही व न्यायव्यवस्थेच्या प्रतिष्ठेला काळिमा फासणारी आहे. तीन महिलांचा समावेश असलेल्या सात न्यायालयीन अधिकार्‍यांना तब्बल नऊ तास संतप्त...