अहिल्यानगर / श्रीगोंदा |प्रतिनिधी| Ahilyanagar
स्थानिक गुन्हे शाखेने कारवाई करत श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव शिवारातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत 1 लाख 20 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार संशयित अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले आहेत. या प्रकरणी बेलवंडी पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील दरोडे, घरफोडी, रोड रॉबरी रोखण्यासाठी तसेच फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीष भोये, अंमलदार भाऊसाहेब काळे, राहुल डोके, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, अमोल कोतकर, योगश कर्डिले, अरूण मोरे, ज्योती शिंदे यांच्या पथकाने बुधवारी (29 जुलै) बेलवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फरार आरोपींचा शोध सुरू असताना ही कारवाई केली.
ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये जावेद घडयाळ चव्हाण (वय 35), प्रद्युम उर्फ कान्हा घडयाळ चव्हाण (वय 20), सगडया उंबर्या काळे (वय 48, हे तिघे रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा), संदेश उर्फ दवल्या संजय भोसले (वय 22, रा. वाघुंडे, ता. पारनेर), रिबीन घडयाळ चव्हाण (वय 55, रा. सुरेगाव) आणि वृषाली देवा काळे (वय 21, रा. कोळगाव) यांचा समावेश आहे. ताब्यातील आरोपींकडून चौकशीदरम्यान अक्षय उंबर्या काळे, तेजस सगडया काळे, शंभू कुंजीलाल चव्हाण आणि शिवाजी कुंजीलाल चव्हाण (सर्व रा. सुरेगाव, ता. श्रीगोंदा) हे चार आरोपी पळून गेल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.
आरोपींची व घटनास्थळाची झडती घेतली असता एक लोखंडी कोयता, लोखंडी पान्हा, मिरची पूड, एक सुरा, बनावट दागिने व गोल सिक्के, चार मोबाईल फोन आणि दोन दुचाकी असा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आरोपींवर गंभीर गुन्हे
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताब्यातील आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर यापूर्वी गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपी जावेद चव्हाण याच्यावर खून, अत्याचार, दरोडा, दरोड्याची तयारी व घरफोडीचे तब्बल 23 गुन्हे नोंद आहेत. सगडया उंबर्या काळे याच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी व घरफोडीसह 16 गुन्हे, तर संदेश उर्फ दवल्या भोसले याच्यावर दरोड्याची तयारी, जबरी चोरी, घरफोडी व चोरीचे पाच गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.




