Monday, November 16, 2026
Homeक्राईमNashik Crime News : ​न्यायालयाच्या आवारातच कायद्याची पायमल्ली; 'तिहेरी तलाक'चा शहरात सहावा...

Nashik Crime News : ​न्यायालयाच्या आवारातच कायद्याची पायमल्ली; ‘तिहेरी तलाक’चा शहरात सहावा गुन्हा

जुना गुन्हा मागे घेण्याच्या रागातून पतीसह सासरच्यांकडून विवाहितेला मारहाण

​नाशिक | प्रतिनिधी | Nashik

​देशात ‘तिहेरी तलाक’ (ट्रिपल तलाक) ही अनिष्ट प्रथा कायद्याने हद्दपार करण्यात आली असली तरी, नाशिक शहरात या कायद्याला आव्हान दिले जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे, या वेळी खुद्द न्यायमंदिराच्या म्हणजेच नाशिक जिल्हा न्यायालय (Nashik Seassion Court) परिसरातच पतीने पत्नीला तीन वेळा ‘तलाक’ म्हणत वैवाहिक संबंध तोडल्याची घटना घडली आहे. या प्रकारानंतर न्यायालय आवारात राडा झाला असून, शहरातील तिहेरी तलाकचा हा सहावा गुन्हा ठरला आहे.  

- Advertisement -

​या प्रकरणी पीडित विवाहितेच्या तक्रारीवरून पती संशयित (Suspected) साकीब साजीद खान, सासरे आणि सासू (सर्व रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विवाहितेने यापूर्वी सासरच्या मंडळींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणाच्या निमित्ताने १ ऑक्टोबर रोजी दुपारी दीड ते पावणेतीन वाजेच्या सुमारास पीडिता आणि सासरची मंडळी नाशिक न्यायालय परिसरात आली होती.

जुन्या गुन्ह्याचा (Case) राग मनात धरून सासऱ्याने न्यायालय आवारातच पीडितेवर ओरडत अंगावर धावून तिचा बुरखा ओढून विनयभंग केला. सासूनेही शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. दरम्यान, पती साकीब खान याने पीडितेला मारहाण करत, “मी तुझ्यापेक्षा सुंदर मुलीसोबत लग्न केले आहे, आता मी तुला तलाक देत आहे,” असे म्हणत आवारात तीन वेळा ‘तलाक, तलाक, तलाक’ असा उच्चार करून तोंडी तिहेरी तलाक दिला. या प्रकारामुळे न्यायालय परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.  

​दीड महिन्यानंतर गुन्हा दाखल

१ ऑक्टोबर रोजी घडलेल्या या प्रकारानंतर पीडितेने सरकारवाडा पोलीस ठाणे गाठले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक युवराज पत्की यांच्या सूचनेने (दि. १४) गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संशयितांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ७४ (विनयभंग), ११५(२), ३५१(२), ३५१(३), ३५२, ३(५) आणि मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) कायदा २०१९ च्या कलम ४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास महिला उपनिरीक्षक सुप्रिया अंभोरे करत आहेत.  

कायदा काय सांगतो?

मुस्लिम महिला (विवाह हक्कांचे संरक्षण) कायदा २०१९ नुसार, तोंडी, लेखी किंवा इलेक्ट्रॉनिक स्वरूपात एकदाच तीन वेळा ‘तलाक’ देणे हा दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा आहे. या कायद्याच्या कलम ४ नुसार गुन्हा सिद्ध झाल्यास पतीला तीन वर्षांपर्यंतच्या कारावासाची आणि दंडाची कठोर शिक्षा होऊ शकते.

​नाशिकमधील तिहेरी तलाक गुन्ह्यांचा आलेख

​पहिला गुन्हा: १ सप्टेंबर २०२३ (इंदिरानगर पोलीस ठाणे)
​दुसरा गुन्हा: २३ एप्रिल २०२५
​तिसरा गुन्हा: २२ ऑगस्ट २०२५
​चौथा गुन्हा: २९ नोव्हेंबर २०२५
​पाचवा गुन्हा: ८ मे २०२६ (मुंबई नाका पोलीस ठाणे)
​सहावा गुन्हा: १४ नोव्हेंबर २०२६ (सरकारवाडा पोलीस ठाणे)

ताज्या बातम्या

थंडीचा

महाबळेश्वरला मागे टाकत ‘या’ जिल्ह्यात कमी तापमानाची नोंद; राज्यात थंडीचा जोर...

0
मुंबई | Mumbaiनोव्हेंबरच्या मध्यात महाराष्ट्रात थंडीचा कडाका हळूहळू वाढू लागला आहे. पहाटे आणि रात्री जाणवणाऱ्या गारव्यामुळे नागरिकांनी उबदार कपडे बाहेर काढले आहेत. विशेष म्हणजे,...