Sunday, September 13, 2026
Homeदेश विदेशगाढ झोपेत काळाचा घाला! हॉटेलला भीषण आग; चिमुकल्यासह ९ पर्यटकांचा दुर्दैवी अंत

गाढ झोपेत काळाचा घाला! हॉटेलला भीषण आग; चिमुकल्यासह ९ पर्यटकांचा दुर्दैवी अंत

कोलकाता | Kolkata

पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता बुधवारी पहाटे भीषण हॉटेल दुर्घटनेने हादरली. शहरातील गजबजलेल्या मिर्झा गालिब स्ट्रीट परिसरातील एका हॉटेलमध्ये अचानक आग लागल्याने एका लहान मुलासह ९ जणांचा मृत्यू झाला, तर अनेक जण जखमी झाले. पर्यटक झोपेत असतानाच आग लागल्याने काही क्षणांत संपूर्ण इमारतीत धुराचे साम्राज्य पसरले आणि अनेकांना बाहेर पडण्यास वेळच मिळाला नाही.

- Advertisement -

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या सुमारास आग लागल्यानंतर हॉटेलच्या खोल्या आणि कॉरिडॉरमध्ये दाट धूर भरला. त्यामुळे अनेक पाहुणे खोल्यांमध्येच अडकले. काहींनी जीव वाचवण्यासाठी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, तर काहींना धुरामुळे गुदमरल्याने गंभीर परिस्थितीचा सामना करावा लागला. या दुर्घटनेत धुराचा सर्वाधिक परिणाम झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

विशेष म्हणजे, संबंधित हॉटेलच्या जवळच अग्निशमन दलाचे कार्यालय असल्याने माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचले. चार अग्निशमन गाड्यांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करण्यात आले. बचाव पथकांनी आत अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढून जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. घटनास्थळी पोलीस आणि प्रशासनानेही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या.

दरम्यान, आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. प्राथमिक स्तरावर शॉर्ट सर्किटची शक्यता व्यक्त केली जात असली, तरी अधिकृत तपास पूर्ण झाल्यानंतरच कारण स्पष्ट होणार आहे. तसेच हॉटेलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा कार्यरत होती का, फायर अलार्म व्यवस्थित चालू होते का आणि आणीबाणीच्या प्रसंगी बाहेर पडण्यासाठी आवश्यक मार्ग उपलब्ध होते का, याचीही चौकशी सुरू करण्यात आली आहे.

उल्लेखनीय म्हणजे, पश्चिम बंगालमध्ये अलिकडच्या काळात घडलेली ही दुसरी मोठी हॉटेल आग दुर्घटना आहे. यापूर्वी तारापीठ येथील एका हॉटेलमध्ये लागलेल्या आगीत नऊ भाविकांचा मृत्यू झाला होता. या सलग घटनांमुळे हॉटेलमधील अग्निसुरक्षा नियमांच्या अंमलबजावणीबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित होत असून, संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

केडगावमध्ये मित्रांच्या त्रासाला कंटाळून मुलाची आत्महत्या

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar शहरातील केडगाव परिसरातील संभाजी चौक, वडारगल्लीत मित्रांच्या सततच्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून एका अल्गपवयीन मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना...