कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargaon
कोपरगावातून पळवून आणलेल्या एका 12 वर्षाच्या अल्पवयीन मुलीची अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या काही दिवसात सुखरूप सुटका केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी धडक कारवाई करत दरेवाडी (सोलापूर रोड) येथून मुख्य अपहरणकर्त्यासह त्याला आश्रय देणार्या साथीदारास ताब्यात घेतले असून पुढील कारवाईसाठी त्यांना कोपरगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
18 ऑगस्ट रोजी कोपरगाव येथून 12 वर्षांच्या मुलीला पळवून नेल्याप्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पथकाने दरेवाडीतील सोलापूर रोडवर असलेल्या हरीमळा येथे छापा टाकला. तेथून मुख्य आरोपी नूर राजू पठाण (वय 19, रा. आंबेडकरनगर, राहाता) याला ताब्यात घेऊन अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली.
पोलीस तपासात आरोपींना पळून येण्यासाठी मदत करणारा आणि स्वतःच्या घरी दोन दिवस आश्रय देणारा समीर मनोज सोनगत (वय 22, रा. दरेवाडी) याचाही सहभाग उघडकीस आल्याने पोलिसांनी त्यालाही तात्काळ बेड्या ठोकल्या. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अत्यंत कौशल्याने आणि धैर्याने पार पाडली.




