कोपरगाव । Kopargaon
कोपरगाव बस स्थानकावर आज दुपारी एक मोठी दुर्घटना टळली. कान्हेगाव वारी मार्गावर जाणारी बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने, या भीषण अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका प्रवाशाचा किरकोळ जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव-कान्हेगाव वारी या बसचे ब्रेक अचानक निकामी झाले. चालकाने गाडीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला, परंतु ब्रेक लागत नसल्याने बस वेगाने फलाट क्रमांक पाचच्या दिशेने गेली आणि थेट कट्ट्यावर चढली. अपघात झाला त्या वेळी शाळा आणि महाविद्यालये सुटण्याची वेळ असल्याने बस स्थानकावर विद्यार्थ्यांची आणि प्रवाशांची प्रचंड गर्दी होती. बस अचानक समोर आल्याने प्रवाशांमध्ये मोठी पळापळ झाली.
या अपघातात बोकटे येथील रहिवासी रामनाथ खंडू तुरकणे यांना बसचा जोरदार धक्का लागला असून ते जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानकावर गर्दी असतानाही सुदैवाने बस कोणाच्या अंगावर न गेल्याने मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेनंतर बस स्थानक परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रशासनाकडून या तांत्रिक बिघाडाची चौकशी केली जात आहे.





