कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargaon
कोपरगाव तालुक्यात अंमली पदार्थांची विक्री करणार्यांविरुद्ध नाशिक विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने मोठी कारवाई केली आहे. तालुक्यातील चासनळी शिवारात धाडसी छापा टाकून पोलिसांनी तब्बल 7 किलो 200 ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला असून, याप्रकरणी एका संशयित तस्कराला अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे तालुक्यातील अवैध धंदे करणार्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, 30 मार्च 2026 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास चासनळी परिसरात अंमली पदार्थांची मोठी खेप येणार असल्याची गोपनीय माहिती नाशिक टास्क फोर्सला मिळाली होती. पोलीस अधीक्षक गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचला. संशयित हालचालींवर लक्ष ठेवून पोलिसांनी अचूक वेळी छापा टाकला आणि संशयिताला जाळ्यात ओढले. पोलिसांनी केलेल्या झडतीत आरोपी मनोज हरी माळी (रा. जगदंबा नगर, चासनळी) याच्याकडे 72 हजार रुपये किमतीचा गांजा सदृश अंमली पदार्थ आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 82 हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पोलिसांनी हा सर्व माल जप्त केला असून आरोपीला कोपरगाव तालुका पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
याप्रकरणी टास्क फोर्सचे कर्मचारी किरण चुनीलाल निकम यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ विरोधी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई नाशिक विभागाच्या वरिष्ठ अधिकार्यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी झाली. या प्रकरणाचा पुढील तपास तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी करत आहेत. या गांजा तस्करीचे धागेदोरे नेमके कुठे आहेत आणि हा माल कुणाकडून आणला जात होता, याचा शोध आता पोलीस घेत आहेत.





