Monday, April 6, 2026
HomeनगरKopargaon News : कोपरगाव तालुक्यात बोगस खताचा मोठा साठा जप्त

Kopargaon News : कोपरगाव तालुक्यात बोगस खताचा मोठा साठा जप्त

रांजणगाव देशमुख ( वार्ताहर)

शेतीचा हंगाम तोंडावर असताना शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा कोपरगाव कृषी विभागाने पर्दाफाश केला आहे. तालुक्यातील देर्डे-कोऱ्हाळे परिसरात एका गोडाऊनमध्ये बनावट खतांचे पॅकिंग सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर कृषी विभागाने धाड टाकून ६ लाख १५ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी सात खत विक्रेते आणि चार खत निर्मिती कंपन्यांवर कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुण नियंत्रण निरीक्षक गणेश बीरदवडे, ग्रामीण पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि त्यांच्या पथकाने ही संयुक्त कारवाई केली. देर्डे-कोऱ्हाळे येथील उद्धव अर्जुनराव शिलेदार यांच्या मालकीच्या गोडाऊनवर छापा टाकला असता, तिथे विविध नामांकित कंपन्यांच्या नावाने खतांच्या गोण्यांचे अवैध पॅकिंग सुरू असल्याचे आढळून आले. घटनास्थळावरून सुमारे ३०० हून अधिक खतांच्या गोण्या जप्त करण्यात आल्या असून, त्यांचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

कृषी विभागाने केलेल्या या धडक कारवाईत धक्कादायक माहिती समोर आली आहे. जप्त केलेल्या ‘झिंक अधिक बोरॉन’ या खताच्या नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात झिंक किंवा बोरॉन यांपैकी कोणतेही घटक आढळले नाहीत. म्हणजेच, शेतकऱ्यांना निव्वळ मातीमोल खत विकले जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. या अहवालाच्या आधारे, संबंधित बनावट खताची विक्री करणाऱ्या सात दुकानांवर आणि ते तयार करणाऱ्या चार कंपन्यांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

या प्रकरणातील महत्त्वाचा पैलू म्हणजे, ज्या कंपन्यांच्या नावाचा वापर गोण्यांवर करण्यात आला होता, त्या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन हे खत आमचे नसल्याचे स्पष्ट केले आहे. बनावट पॅकिंग करून आणि नामांकित ब्रँड्सचा वापर करून शेतकऱ्यांची मोठी आर्थिक फसवणूक केली जात असल्याचा संशय आता खरा ठरला आहे. आरोपी उद्धव शिलेदार यांच्याविरुद्ध खत नियंत्रण आदेश आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

कोपरगाव तालुक्यात बनावट खतांचा सुळसुळाट वाढल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. पिकांच्या वाढीसाठी आणि चांगल्या उत्पादनासाठी शेतकरी महागडी खते खरेदी करतात, मात्र अशा बनावट खतांमुळे पिकांची वाढ खुंटते आणि उत्पादनात मोठी घट होते. निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच संकटात असलेल्या बळीराजावर हा दुहेरी आघात आहे. निकृष्ट खतांमुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च वाढतो आणि पदरी निराशा पडते, ज्यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसत आहे.

कृषी विभागाने या कारवाईनंतर सर्व खत विक्रेत्यांना कडक इशारा दिला आहे. कोणत्याही परिस्थितीत नियमांचे उल्लंघन खपवून घेतले जाणार नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शेतकऱ्यांनी खत खरेदी करताना नेहमी अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदी करावी आणि पक्के बिल आवर्जून घ्यावे. तसेच, खताच्या गोणीवरील माहिती तपासावी आणि कोणताही संशय आल्यास तात्काळ स्थानिक कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी विभागातर्फे करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Shrigonda Crime : केरोसीन विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये दुप्पट वाढ

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) जगभरातील युध्दजन्य परिस्थितीमुळे एलपीजी सिलिंडरच्या पुरवठ्यावर परिणाम होत असताना राज्य शासनाने पर्यायी उपाय म्हणून केरोसीन वितरणाला चालना दिली आहे. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब...