Friday, May 3, 2024
Homeनगरकोपरगावच्या खरात टोळी विरोधात ‘मोक्का’

कोपरगावच्या खरात टोळी विरोधात ‘मोक्का’

अहमदनगर |प्रतिनिधी|Ahmednagar

नगर- मनमाड रस्त्यावर प्रवाशांना आडवून लुटमार करणार्‍या टोळीवर ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलिसांनी पाठविलेल्या प्रस्तावाला नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. बी. जी.शेखर यांनी मंजुरी दिली आहे.

- Advertisement -

टोळी प्रमुख योगेश खरात (रा. भोजडे चौक, कोपरगाव), टोळी सदस्य अनिल अण्णासाहेब मालदोडे (रा. पिंपळवाडी माऊलीनगर, शिर्डी, ता. राहाता), गुड्डू ऊर्फ सागर विठ्ठल मगर (रा. हनुमानवाडी, कान्हेगाव ता. कोपरगाव), सोनु सुधाकर पवार (रा. हॉलिडे पार्क शेजारी, शिर्डी, ता. राहाता), किरण बबन कोळपे, आकाश पांडुरंग शिंदे (दोघे रा. विळद ता. नगर), महेश विठ्ठल वाघ, सोनु ऊर्फ शुभम रावसाहेब ठोंबे (दोघे रा. खांडके ता. नगर), धनंजय प्रकाश काळे (रा. रामवाडी, संवत्सर, ता. कोपरगाव) व मयुर अनिल गायकवाड (रा. इंदिरानगर, कोपरगाव) अशी ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 12 जून 2023 रोजी रात्री दोघे जण त्यांच्या चारचाकी वाहनातून नगर- मनमाड रस्त्याने राहुरीकडे येत असताना त्यांच्या वाहनाची काच दरोडेखोरांच्या टोळीने फोडली व त्यांना अज्ञातस्थळी घेऊन जात नऊ लाख रुपये, तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने लुटले होते.

मारहाण करून वांबोरी घाटाजवळ सोडून देत पळून गेले होते. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरचा गुन्हा योगेश खरात व त्याच्या टोळीने केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. खरातसह आठ जणांना अटक करण्यात आली असून त्यांचे साथीदार धनंजय काळे व मयुर गायकवाड पसार आहेत. दरम्यान, खरात व त्याच्या साथीदारांनी राहुरी पोलीस ठाणे हद्दीत गंभीर स्वरूपाचे 22 गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्या टोळी विरोधात ‘मोक्का’ कायद्यान्वये कारवाई करण्याबाबात प्रस्ताव राहुरी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यामार्फत पोलीस अधीक्षक ओला यांच्याकडे पाठविला. अधीक्षक ओला यांनी सदरचा प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी विशेष पोलीस महानिरीक्षक शेखर यांच्याकडे सादर केला. महानिरीक्षक शेखर यांनी सदर प्रस्तावाला मंजुरी दिली असून खरात टोळी विरोधात ‘मोक्का’चे वाढीव कलम लावण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस उपअधीक्षक (श्रीरामपूर विभाग) बसवराज शिवपुजे करत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या