Friday, May 1, 2026
Homeनगरवार्तापत्र : कोपरगावच्या शेतकर्‍यांचे सोयाबीन व मका पिकाला प्राधान्य

वार्तापत्र : कोपरगावच्या शेतकर्‍यांचे सोयाबीन व मका पिकाला प्राधान्य

ऊस पट्ट्यात तूर, उडीद आणि कापसाचीही लागवड

कोपरगाव तालुका वार्तापत्र | राहुल देवरे

ऊस उत्पादकांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या कोपरगाव तालुक्यात तूर, उडीद आणि कापसाचीही लागवड केली जात आहे. हा प्रयोग अत्यल्प क्षेत्रावर असला तरीही शेतकरी या पिकांकडे वळत असल्याचे दिसते. कोपरगाव तालुक्यात 52 हजार 400 हेक्टरवर खरिपाची पेरणी होणार आहे. खरीप हंगामात सोयाबीन लागवडीचे क्षेत्र सर्वाधिक आहे. 24 हजार हेक्टरवर सोयाबिनचा पेरा होईल. त्या खालोखाल मका पिकाची लागवड 18 हजार हेक्टरवर होण्याचा अंदाज आहे. उडीद 50 हेक्टर, तूर 100 हेक्टर, बाजरी 1 हजार हेक्टर, भुईमुग 300 हेक्टर तर कापूस 1 हजार 600 हेक्टरवर पेरणीचे नियोजन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

- Advertisement -

यासाठी बाजरी, मका, तूर, मुग, उडीद, भुईमुग, सोयाबीन यांचे मिळून जवळपास साडेनऊ हजार क्विंटल बियाणे लागणार आहे. याशिवाय कापूस बियाणांच्या 6 हजार 400 बॅग लागणार आहे. बियाणे मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हावेत, यासाठी कृषी विभाग सज्ज झाला आहे. पेरणीच्या वेळी खत, बियाणांची होणारी साठेबाजी तसेच बोगस बियाणे आणि खतांची विक्री करणारे याकाळात वाढतात. या गोष्टींना आळा बसावा यासाठी कृषी विभागाने आपली तयारी पूर्ण केली आहे. बनावट बियाणे, अवैध आणि विनापरवाना खते, जादा दराने खते आणि बियाणांची विक्री करणार्‍यांवर थेट कारवाई करण्यासाठी तालुकास्तरीय भरारी पथकांची स्थापना करण्यात आलेली आहे. बोगस माल जप्त करणे आणि संबंधिताविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदविणे किंवा न्यायालयात थेट खटला भरण्याचे अधिकार या पथकांना आहेत.

काही परवानाधारक दुकानदार शेतकर्‍यांना अनुदानित रासायनिक खत आणि बियाणे विक्री करण्यासाठी अन्य माल घेण्याची सक्ती करतात. अशा प्रकारे लिंकिंग करून शेतकर्‍यांना लुबाडले जाते. यासाठी तालुका कृषी अधिकारी मनोज सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली एक तालुकास्तरीय भरारी पथक स्थापन केले आहे. पंचायत समितीचे तालुका कृषी अधिकारी सचिन कोष्टी हे या पथकाचे सचिव आहेत. तालुकास्तरीय भरारी पथकात सात अधिकारी आहेत. यात तालुका कृषी अधिकारी हे पथक प्रमुख असतील. पंचायत समितीचे कृषी अधिकारी सदस्य सचिव आहेत. चार मंडल कृषी अधिकारी आणि तसेच वैधमापन शास्त्र विभागाचे निरीक्षक हे सदस्य आहेत.

कोपरगाव तालुक्यात शेतकर्‍यांना गुणवत्तापूर्ण बियाणे व खते मिळण्यासाठी कृषी विभाग सज्ज झाला असून शेतकर्‍यांनी अधिकृत विक्रेत्याकडूनच बियाणे खते, औषधे खरेदी करावी. बनावट खते, बियाणे, औषधे अथवा खते लिंकिग याबद्दल शेतकर्‍यांची काही तक्रार असल्यास कृषी विभागाशी संपर्क साधावा. कृषी सहायक हे शेतकर्‍यांना बियाणे, खते, औषधे याविषयी माहिती देतील. त्याचप्रमाणे बोगस माल ओळखण्यासाठी मदत करतील. शेतकर्‍यांच्या तक्रारी त्वरित संबंधित अधिकार्‍यांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही त्यांच्याकडे असेल. मान्सूनपूर्व पाऊस झालेला आहे. पुढेही थोडाफार पाऊस होईल परंतू 75 ते 100 मिली मीटर पाऊस झाल्याशिवाय शेतकर्‍यांनी पेरणी करु नये.
– मनोज सोनवणे, तालुका कृषी अधिकारी.

ताज्या बातम्या

Sanjay Raut : …तर मुख्यमंत्र्यांना इतक्या मिरच्या का झोंबतायत? संजय राऊत...

0
मुंबई । Mumbai महाराष्ट्राच्या मातीत पुन्हा एकदा 'मराठी' भाषेच्या अस्मितेचा वणवा पेटला असून, राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. राज्यातील रिक्षा आणि टॅक्सी चालकांना...