Sunday, January 25, 2026
Homeक्राईमKopargav : कोपरगाव शहरात दोन राजकीय गटांमध्ये तुंबळ हाणामारी व दगडफेक

Kopargav : कोपरगाव शहरात दोन राजकीय गटांमध्ये तुंबळ हाणामारी व दगडफेक

63 जणांवर गुन्हा दाखल || दोन पोलिसांसह अनेक जण जखमी

कोपरगाव |तालुका प्रतिनिधी| Kopargav

कोपरगाव (Kopargav) शहरातील मोहनीराजनगर भागात किरकोळ कारणावरून बुधवार 24 सप्टेंबर रोजी रात्री उशिरा दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारीसह (Two Groups Fight) एकमेकांवर दगडफेक करण्यात आली आहे. याबाबत दोन्ही गटातील 63 जणांवर गुन्हा दाखल करून 16 आरोपी (Accused) ताब्यात घेण्यात आले आहेत. या दरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक (Stone Throwing) केल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.

- Advertisement -

घटनेची माहिती मिळताच कोपरगाव शहर पोलीस ठाण्याचे (Kopargav City Police Station) पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. सुरुवातीला पोलिसांची संख्या कमी असल्याने जमावाने पोलीस वाहनावर दगडफेक केली. नंतर काही क्षणांत पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाल्याने परिस्थितीवर नियंत्रण मिळवता आले.

YouTube video player

पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करून परिसर शांत केला. या प्रकरणात परस्परविरोधी फिर्यादी देण्यात आल्या असून संबंधित दोन्ही गटातील 63 जणांवर भारतीय दंडसंहितेच्या विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दोन्ही बाजूंचे 16 आरोपी ताब्यात घेण्यात आले आहेत. घटनेचे गांभीर्य ओळखून शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक अमोल भारती यांनी घटनास्थळी रात्री उशिरा भेट दिली. परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. यावेळी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार, पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने आणि पीएसआय दीपक रोठे वेळीच घटनास्थळी पोहोचले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

त्यानंतर तालुका पोलीस निरीक्षक संदीप कोळी, शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे हे आपल्या फौजफाट्यासह रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. दोन्ही गटात विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते असल्याने मोठा जमाव रात्री उशिरा पोलीस ठाण्याच्या आवारात जमा झाला होता. झालेल्या दगडफेकीत अनेकजण जखमी झाले आहेत. तसेच पोलीस कॉन्स्टेबल भांगरे आणि सुंबे जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

याबाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात विवेक राजेंद्र आव्हाड रा. निमगाव यांनी प्रथम पोलीस स्टेशन गाठत फिर्याद दिली. यात म्हटले की, 24 सप्टेंबर रोजी रात्री पावणेबारा वाजता ते व त्यांचे कुटुंब त्यांच्या ब्रेझा कारमधून निमगाव येथे त्यांचे घरी जात असताना मोहिनीराजनगर येथे खंडोबा मंदिराचे जवळ पोहचले असताना गुन्ह्यातील आरोपी अरुण बाजीराव जोशी, राजेंद्र बाजीराव जोशी, शुभम राजेंद्र जोशी यांनी गैरकायद्याची मंडळी जमवून त्यांची गाडी अडवून तू इकडुन कसा काय आला? हा रस्ता तुझ्या बापाचा आहे का असे म्हणून क्रिकेटचा स्टम्प व लोखंडी रॉडने फिर्यादी व त्यांच्या सोबत असलेला पुतण्या, आई आणि बहीण यांना जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली. फिर्यादीच्या आईच्या गळ्यातील 1 तोळे वजनाचे सोन्याचे गंठण मयुर संजय सुपेकर याने तोडुन नेले आहे.

फिर्यादीला सोडविण्यासाठी आलेले त्यांचे भाऊ सुरज कैलास आव्हाड, अविनाश नामदेव गिते, गौरव मोरे, संदीप विनायक आव्हाड आले असताना सुरज कैलास आव्हाड यास अरुण जोशी यांनी जिवे ठार मारण्याचे उद्देशाने त्यांच्या हातातील क्रिकेटच्या स्टम्पने कपाळावर मारुन जखमी केले आहे. तसेच गौरव मोरे यास देखील शुभम राजेंद्र जोशी याने जिवे ठार मारण्याचे उद्देशाने लोखंडी रॉड त्याचे नाकावर, तसेच डोक्यावर मारुन जखमी केले व अविनाश गिते यास राजेंद्र जोशी याने क्रिकेटच्या स्टम्पने जखमी केले आहे. अक्षय मिनानाथ आग्रे याने माझ्या गळ्यात असलेली 1 तोळे वजनाची सोन्याची चैन हिसकावून घेत फिर्यादी व त्यांचे कुटुंबावर दगडफेक करुन शिवीगाळ दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

या फिर्यादीवरुन आरोपी अरुण बाजीराव जोशी, राजेंद्र बाजीराव जोशी, शुभम राजेंद्र जोशी, मयुर संजय सुपेकर, अजय छबुराव सुपेकर, अजिंक्य गणेश काकडे, निलेश बापुराव काकडे, राहुल सतिष काकडे, संजय उर्फ भैय्या सुपेकर, अनिल उर्फ पिंटु गंगावणे, विजय छबु सुपेकर, उमेश साईनाथ गोर्डे, गोरख विलास सुपेकर, दर्शन संजय पवार, अभय राजेंद्र पवार, प्रतिक राजेंद्र धुमाळ, अनिल दत्तु सुपेकर, सतिष बाबुराव काकडे, ओमकार नाना गोर्डे, बाळु दिरथनाथ गोर्डे, अक्षय मिनानाथ आग्रे व इतर 15 ते 20 लोक सर्व रा. कोपरगाव यांच्यावर गुन्हा रजिस्टर नंबर 474/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 (1), 126(2), 189(2), 191(2), 191(3), 190, 119(1), 324(4), 115(2), 352, 351 (2) सह शस्र अधिनियम 4/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक रोठे करीत आहेत.

दुसर्‍या बाजूने सुनील योगेश गोरडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास ते व त्यांची आई कल्पना असे अर्जुन तरुण मंडळ यांचा नवरात्री उत्सवाचा दांडियाचा कार्यक्रम असल्याने सोनू आव्हाड, शुभम आढाव आणि सागर पंडोरे तेथे थांबलेले असताना चारचाकी वाहनात येऊन फिर्यादीच्या आईला कट लागल्याचे कारणावरुन गैरकायद्याची मंडळी जमवून तुमचे आज कामच करतो असे म्हणून फिर्यादीला जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादी, त्यांची आई व साक्षीदार यांच्यावर दगडफेक करुन हल्ला करत धक्काबुक्की, शिवीगाळ दमदाटी केली. तसेच इतर आरोपींनी लाकडी दांडे व लोखंडी रॉड या हत्याराने मारहाण करुन जिवे ठार मारण्याचे उद्देशाने फिर्यादी व साक्षीदार यांच्यावर दगडफेक केली.

मारहाणीत फिर्यादीची चुलती वनिता नारायण गोर्डे हिची आरोपी सोनु कैलास आव्हाड याने 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन तोडुन नेली आहे. मारहाणीत शिवीगाळ दमदाटी करुन जिवे ठार मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी आरोपी सोनु कैलास आव्हाड, शुभम आढाव, सागर पंडोरे, अनिल उर्फ कालु आप्पा विनायक आव्हाड, अनुप उर्फ आन्या विनायक आव्हाड, रोहीत माळी, अवधुत शिंदे, कैलास आव्हाड, विनायक आव्हाड, दत्तू पंडोरे, किरण आव्हाड, अविनाश गिते, मोहन चव्हाण, गणेश चव्हाण, नितीन घुगे, सचिन साहेबराव घुगे, सागर संजय मोरे, संदीप माधवराव देवरे, सचिन हंसराज आढाव, शाम नारायण झुरळे, प्रवीण दत्तू पंडोरे, नितीन आमरे व इतर सर्व रा. कोपरगाव यांच्या विरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 475/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 109 (1), 118(1), 189(2), 191(2), 191(3), 190, 119(1), 115(2), 352, 351(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप सोन्ने करीत आहे. दरम्यान सध्या मोहिनीराजनगर भागात तणावपूर्ण शांतता असून अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी देखील गुरुवारी दुपारी घटनास्थळी भेट दिली. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने काळजी घेत एसआरपीएफची तुकडी तैनात करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या