Saturday, July 25, 2026
HomeनगरRahata : कोर्‍हाळे परिसरात वादळी वार्‍याने मोठे नुकसान

Rahata : कोर्‍हाळे परिसरात वादळी वार्‍याने मोठे नुकसान

15 ते 20 घरांचे पत्रे उडाले || सोलरचे नुकसान

कोर्‍हाळे |वार्ताहर| Korhale

राहाता तालुक्यातील कोर्‍हाळे वाळकी परिसरात अवकाळी पाऊस आणि वादळी वार्‍यामुळे मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याच्या वार्‍याने झाडे पडली, घरांची पत्रे उडाली, विजेचे खांब पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला, शेतात बसवलेले सोलरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, शेतात काढून पडलेल्या कांद्याचे तसेच डाळिंब फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे.

- Advertisement -

वादळी वार्‍याने वाळकी येथे 15-20 घरांचे पत्रे उडाल्याने अनेक कुटुंबांचे संसार उघड्यावर पडले आहे. तसेच संसार उपयोगी वस्तूंचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. वादळाने झालेल्या नुकसानाची माहिती मिळताच कोर्‍हाळे येथील महसूल अधिकारी अपर्णा शिलावंत, वाळकी येथील ग्रामसेविका श्रीमती गावित यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तसेच या कुटुंबांना शासन स्तरावर मदत मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. असे सांगितले.

भांबारे मळा परिसरात राहणारे अरुण अशोक गुडघे या शेतकर्‍याने आपल्या शेतातील विहिरीवर बसवलेले सोलरचेही वादळी वार्‍याने मोठे नुकसान झाले आहे. वादळाने तुटलेल्या विज तारांचा धक्का लागून कोर्‍हाळेत चार मेंढ्या ठार झाल्या आहे. कोर्‍हाळे भांबारे मळा शिवारात रात्री झालेल्या वादळी वार्‍याने विजेच्या तारा तुटल्या होत्या. तसेच त्यामधून वीजप्रवाह ही चालू होता. सकाळी मेंढपाळ कचरू तासकर हे आपल्या मेंढ्या चारण्यासाठी घेऊन गेले असता त्यांना तुटलेल्या तारांचा अंदाज न आल्याने पुढे चालत असणार्‍या मेंढ्यांना विजेचा धक्का लागून 4 मेंढ्या ठार झाल्या. बाकी मेंढ्या दूर असल्याने मोठा अनर्थ टळला. मेंढ्यांचा आरडाओरडा ऐकून मेंढपाळ सावध झाले व या तारेपासून त्यांनी दूर होत स्वतःचा व इतर मेंढ्यांचा जीव वाचवला असला तरी या मेंढपाळाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी श्री. गार्गे तसेच पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. एनगे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा केला. तसेच मेंढपाळास शासकीय नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सहकार्य केली जाईल, असे सांगितले. यावेळी बाबासाहेब ठोंबरे, मयूर चांगले, विलास डांगे, गणीभाई शेख, संपतराव शिरोळे, सचिन कान्होरे, रामनाथ वेताळ, गणेश भांबारे, रामेश्वर तासकर, सचिन भांबारे, भिवसेन शिंदे, रामनाथ भांबारे आदींसह शेतकरी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

सहा लाखांच्या एमडी ड्रग्जसह राजस्थानच्या तरुणाला पकडले; दोघे कारसह पसार

0
अहिल्यानगर (प्रतिनिधी) एमआयडीसी पोलिसांनी निंबळक बायपास परिसरात कारवाई करत सुमारे पाच लाख ८३ हजार २०० रूपये किमतीचे २९.१६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) अंमली पदार्थासह राजस्थानमधील एका...