Friday, May 3, 2024
Homeनगरकोठला, हवेलीत सवारीची स्थापना

कोठला, हवेलीत सवारीची स्थापना

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मोहरमनिमित्त मंगळवारी कोठला, हवेलीत सवारीची स्थापना झाली. स्थापन झालेल्या सवार्‍यांचे विसर्जन यंदा जागेवरच करण्याचा विचार जिल्हा प्रशासनात सुरू आहे.

- Advertisement -

तशा सूचना मोहरम कमिटीला दिल्या जाणार असल्याची माहिती प्रशासनातील सूत्रांनी दिली.

यंदा करोनाचे संकट असल्याने धार्मिक उत्सवावर मर्यादा आल्या आहेत. गणेशोत्सवाचे स्वरूपही यंदा बदलले आहे. कोणताही जल्लोष न करता यंदा सर्वाजनिक उत्सव साजरे केले जाणार आहेत.

शांतता समितीच्या बैठकीत प्रशासनाने सवारी दर्शनालाही बंदी घालण्यात आली आहे. याशिवाय कत्तलची रात्र मिरवणूक काढण्यालाही मनाई करण्यात आली आहे. राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार पोलिसांनी हे आदेश दिले आहेत.

दरम्यान, मंगळवारी सायंकाळी कोठला येथे छोटे इमाम तर हवेलीत बडे बारा इमाम सवार्‍यांची स्थापना करण्यात आली. सवार्‍यांची स्थापना झाल्यानंतर भाविकांना दर्शनाची सुविधा ऑनलाईन करण्यावर भर दिला जात आहे.

शनिवारी कत्तलची रात्र मिरवणूक निघणार नाही. रविवारी सवारी विसर्जन केल्या जाणार आहेत. यंदा करोनाच्या पार्श्वभूमीवर विसर्जन मिरवणूक काढण्यावर बंदी घालण्यात आली आहे. कोठला येथे सवारी स्थापनेशेजारीच बारव असून तेथेच या सवारीचे विसर्जन केले जाणार आहे.

तर हवेलीतील बडे बारा इमाम सवारी विसर्जनासाठी महापालिका प्रशासन सुविधा उपलब्ध करून देणार आहे. तसे पत्र पोलीस महापालिकेला देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सवारी स्थापन करतेवेळी शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महानगरपालिकेचे पथक त्याठिकाणी उपस्थित होते. सवारी स्थापन करतेवेळी काही ठराविक लोकांना परवानगी देण्यात आली होती. सवारीचे वजन सुमारे नऊशे किलोपेक्षा जास्त असल्याने पाच पेक्षा जास्त लोक त्याठिकाणी उपस्थित होते. यामुळे त्यांचे ऑक्सिजन व तापमान तपासणी करून त्यांना परवानगी देण्यात आली होती. पाच दिवस सवारी ठिकाणी बंदोबस्त तैनात राहणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या