मुंबई । Mumbai
राज्यात आगामी महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मुंबई आणि आसपासच्या महानगर क्षेत्रांमध्ये मतदारांची समीकरणे जुळवण्यासाठी सर्वच पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने उत्तर भारतीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी विशेष रणनीती आखली आहे. मात्र, भाजप नेते कृपाशंकर सिंह यांनी केलेल्या एका विधानामुळे आता नवा राजकीय वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय समाजाची संख्या मोठी आहे. हीच बाब लक्षात घेऊन भाजपच्या उत्तर भारतीय मोर्चाच्या वतीने या भागात विविध संमेलनांचे आयोजन केले जात आहे. अशाच एका संमेलनात बोलताना कृपाशंकर सिंह यांनी कार्यकर्त्यांमध्ये जोश भरताना मोठे विधान केले. “यावेळी मीरा भाईंदरमध्ये उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसवूया,” असा नारा त्यांनी दिला. त्यांच्या या विधानानंतर स्थानिक राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
संमेलनात उपस्थितांना संबोधित करताना सिंह म्हणाले की, बिहार विधानसभा निवडणुकीनंतरची ही सलग नववी सार्वजनिक निवडणूक आहे. जनता गेल्या अनेक दिवसांपासून महानगरपालिका निवडणुकांची प्रतीक्षा करत होती. त्यांनी विश्वास व्यक्त केला की, मीरा भाईंदरसह राज्यातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीची सत्ता येईल. “आम्ही इतक्या मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणू की, त्यातून उत्तर भारतीय समाजाचा महापौर बसवणे सहज शक्य होईल,” असा दावाही त्यांनी यावेळी केला.
कृपाशंकर सिंह यांच्या या भूमिकेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते सचिन अहिर यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. सिंह यांचे वक्तव्य म्हणजे मराठी माणसाचा अपमान असल्याचे त्यांनी म्हटले आहे. भाजप नेत्यांच्या या विधानाला त्यांनी ‘राजकीय माज’ असे संबोधले. मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात मराठी अस्मितेचा मुद्दा संवेदनशील असताना, अशा प्रकारे हिंदी भाषिक महापौराचे आवाहन करणे हे आव्हानात्मक आणि चिथावणीखोर असल्याचे अहिर यांनी नमूद केले.
सचिन अहिर पुढे म्हणाले की, “भाजपच्या नेत्यांची ही हिंमत वाढली आहे. मुंबई किंवा आसपासच्या शहरांचा महापौर केवळ हिंदी भाषिकच व्हायला पाहिजे, अशी विधाने करून ते मराठीवर प्रेम करणाऱ्या इतर भाषिकांचाही अपमान करत आहेत. मतदारांनी हा प्रकार लक्षात घेतला असून, या निवडणुकीत जनतेचा हा माज उतरवल्याशिवाय राहणार नाही.”
महानगरपालिका निवडणुकीत आता भाषिक आणि प्रांतीय समीकरणांचे वर्चस्व दिसून येत आहे. एकीकडे भाजप उत्तर भारतीय मतांची मोट बांधत असताना, दुसरीकडे विरोधक मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत. त्यामुळे मीरा भाईंदरमधील ही निवडणूक केवळ स्थानिक विकासकामांवर न राहता भाषिक अस्मितेच्या लढाईत रुपांतरित होण्याची चिन्हे दिसत आहेत.





