Tuesday, December 3, 2024
Homeशब्दगंधकुडमुडे जोशी

कुडमुडे जोशी

– वैजयंती सिन्नरकर

मराठी मुलखाला लोककलांचा समृद्ध वारसा आहे खरा, पण कालौघात त्यातील अनेक कला लोप पावत चालल्या आहेत. त्या लोककलांची आणि ती पुढे नेणार्‍या अनोख्या परंपरांची ओळख करून देणारे नवे कोरे सदर..

- Advertisement -

मुले धावत पळत पुढे जात होती. संजयने मुलांना थांबवले आणि म्हटले, हे पाहा इकडे काय आहे? आणि ते काय म्हणताहेत ऐका. मुलांचे लक्ष त्या लोककलेकडे गेले आणि तेव्हा आवाज येत होता.

उजळून आलं आभाळ रामाच्या पारी

संजय सांगू लागला, पहाटे पहाटे येणारे, ज्यांच्या येण्यामुळे कानावर कुडमुडाचा आवाज यायचा असे ते म्हणजेच तुम्ही ज्यांना ऐकत आहात ते आहे कुडमुडे जोशी. भविष्य सांगून उदरनिर्वाह करणारे महाराष्ट्रातील कुडमुडे जोशी किंवा चिडबुडके जोशी असेही त्यांना संबोधले जाते. काहीजण भल्या पहाटे जातात, हातात कंदिल घेतात, त्याचा उपयोग उजेडासाठी होतो. त्यांच्या बरोबर एक छोटेसे डमरूसारखे वाद्य असते.

कुडमुडे जोशी हे लोकांच्या दारात पहाटे जाऊन न्यायनीतीचे चरित्र गात. इतिहास कथा सांगत. रामायण, महाभारत पुराण वाचायला कष्ट करणार्‍यांना उसंत नसते. ही मंडळी समाजाची अशी नैतिक भूक भागवत असतात. त्याबद्दल कृतज्ञता म्हणून समाज त्यांचा सन्मान करत असे. त्यांना भिक्षा देत असे.

आता भिक्षा म्हणजे काय? हे पण तुम्हाला सविस्तर सांगतो. पुराणकथेनुसार विष्णूने वामन अवतारात भिक्षेचे महत्त्व सांगितले आहे. मनुष्य मात्र जन्मतः भिक्षूकच असतो, कारण त्याला आईकडून दूध मिळते, गुरूकडून शिक्षण, वगैरे. समर्थांनी भिक्षा निरूपण या समासात भिक्षेचे फायदे पद्धती समजून सांगितल्या आहेत.

ऐसा भिक्षेचा महिमा ।

भिक्षा माने सर्वोत्तम ॥

ईश्वराचा अगाध महिमा ।

तो ही भिक्षा मागे ॥

दत्तगोरक्ष आदिकरूनी ।

सिद्ध भिक्ष मागती जनी ॥

निस्पृहता भिक्षेपासुनी ।

प्रगट होये ॥

कुडमुडे जोशी कष्टकरी असल्यामुळे त्यांना भिक्षा हा शब्द तिथे वापरण्यात आलेला आहे. भिक्षा मागताना कपडा-लत्ता, पैसा- अडका, धन-धान्य मागून घेतात. हे लोक भविष्य सांगण्याचा व्यवसाय करतात. कुडमुडे जोशी यांच्या स्त्रिया जुन्या कपड्यांचा व्यवसाय करतात

यड लागलं येडू बाईच

ध्यान लागलं तुळजापूरच ग तुळजापूरच

माझ्या तुळजापुराला जायाचं जायाचं

अंबा बाईला पहायात पहायात

सुख माझ्या संसाराला घेयात घेयात

ध्यान लागलं येडू बाईच येडू बाईच

असे म्हणत म्हणत ते दुसर्‍या दारावर जात भिक्षा मागत आणि भविष्य सांगत.

ते आपापसात सुरक्षितपणे संवाद साधण्यासाठी खिवारी किंवा पारसी नावाची सांकेतिक भाषादेखील वापरतात. कुडमुडे जोशी म्हटले की, समोरच्याचा विश्वास संपादन करणारे, चेहर्‍यावरून भविष्य सांगून प्रगतीचे स्वप्न दाखवणारे, पंचांग, ग्रह तारे यांच्यावर आधारित पंचांगाचे ज्ञान, कला अवगत असणारे लोक म्हणजे कुडमुडे जोशी. हे महाराष्ट्रातले रहिवासी असले तरी त्यांचा कर्नाटक, आंध्र प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, दिल्ली असा संपर्क आला आहे. महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेर सिवारी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जोशी समाजाने स्वराज्यसाठी हातभार लावला, त्यावेळी शत्रूकडून माहिती काढण्यासाठी हेरगिरी करण्याची जबाबदारी जोशींकडे होती. या लोकांनी करपल्लवी ही विशेष कला जोपासली होती. हात आणि बोटांच्या वेगवेगळ्या हालचालीतून ही मंडळी समोरच्या जोडीदाराला संदेश देत असे याशिवाय टेकड्यांवर उभे राहूनही लांब थांबलेल्या सहकार्‍यांना करपल्लवी वाटे निरोप दिले जात. बहिर्जी नाईक यांच्या विश्वासू सहकार्‍यांमध्ये जोशी समाजातील कार्यकर्त्यांचा समावेश होता.

छत्रपती शिवाजी महाराजांची पूजा करणारे, महाराजांना आपले कुलदैवत मानणारे, ज्या गावी युद्ध करायचे त्या गावची माहिती आधीच देणारे, कुडमुडे जोशी यांना शिवाजी महाराजांकडून जोखमीचा शिलेदार अशी पदवी मिळाली होती. शिवाय सातारा जिल्ह्यातील वाई या गावची वतनदारी मिळाली होती. कुडमुडे जोशी हे भटके म्हणूनच प्रसिद्ध आहेत.

कुडमुडे जोशी आले की, सुवासिनी त्यांना ओवाळून कपडा द्यायच्या आणि जोशी त्यांचे भविष्य सांगायचे. आशीर्वाद द्यायचे.

जाऊ जाऊ पंढरपुरा

भिमा चांद्रभागेला उभा करा

विठ्ठल तुझे नाम घेऊन

सुखी रहावा

करतो धावा धावा

पंढरपूरला जावा जावा

दिंडी सोहळ्याला उभा रहावा

कीर्तनाला आरती लावा

सुख मागून मोठं व्हावा

भिमा चंद्रभागेला उभा रहावा

देव भाग्याचा येईल दारी

मी स्नान करीन घरी

भिमा आणि चंद्रभागेला देव

भेटून जाईन दारी दारी

हाका मारतो रुक्मिणीला

परेशन हो त्याला

आली दिंडी बाई दरवर्षाची

आपल्या नगराला नगराला

असे म्हणत म्हणत ते विठ्ठलाचे दर्शनही घडवून देतात. दिंडीही शब्दातून घेऊन येतात.

जोशी समाजाच्या प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्न होताना दिसून येतात. जोशी आळीतील महिलांना शिक्षण आणि व्यवसायाचे प्रशिक्षण दिले जाते. विद्यार्थ्यांसाठी नियमित मार्गदर्शन शिबिरे आयोजित केली जातात. होतकरू आणि गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली जाते. समाजातील दानशूर मंडळी यासाठी मदत करतात, हा समाज आता स्थित्यंतराच्या टप्प्यावर आहे. समाजातील नव्या पिढीतील मुले उच्चशिक्षण घेत आहेत, अनेकांनी आधुनिक विचार स्वीकारून कालबाह्य रूढी आणि अंधश्रद्धांना निरोप दिला आहे. मुलांनो, त्यांनी डमरूसारखे वाद्य वाजवायला सुरुवात केली. म्हणजे आता ते पुढे जाणार. चला आपल्यालाही पुढच्या कलेकडे जायचे आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या