Thursday, May 21, 2026
HomeनगरAhilyanagar : ‘कुल्फी’तही भेसळ; अमूल ब्रँडच्या 1,856 पॅकेट्स जप्त

Ahilyanagar : ‘कुल्फी’तही भेसळ; अमूल ब्रँडच्या 1,856 पॅकेट्स जप्त

वनस्पती तेल व फॅट वापरल्याचा संशय

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अन्न व औषध प्रशासनाने सोमवारी (13 एप्रिल) भेसळयुक्त कुल्फीविरोधात कारवाई करत 55 हजार 680 रूपये किंमतीची एक हजार 856 पॅकेट्स कुल्फी जप्त केली. विशेष म्हणजे, हे पॅकेट्स नामांकित ‘अमूल’ ब्रँडच्या विविध प्रकारच्या कुल्फींचे असून यामध्ये वनस्पती तेल व फॅटचा वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला असून, या प्रकरणामुळे ग्राहकांमध्ये खळबळ उडाली आहे.

- Advertisement -

अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. मात्र, तपासणीदरम्यान संबंधित कुल्फींमध्ये अशा घटकांचा वापर होत असल्याचे निदर्शनास आल्याची माहिती अन्न सुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी दिली. संशयित नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले असून, अहवालानंतर पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
बडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनमार्फत (‘अमूल’) उत्पादित आणि पुरवठा होणार्‍या कुल्फींमध्ये भेसळ होत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती.

त्यानुसार शहरातील तीन प्रमुख वितरकांना माल पुरवठा करणार्‍या वाहनाची तपासणी करण्यात आली. यावेळी संशयास्पद कुल्फीचा साठा आढळून आला आणि तो तात्काळ जप्त करण्यात आला. या प्रकरणी संबंधित कंपनीला खुलासा सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून, नियमभंग सिध्द झाल्यास कठोर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ही कारवाई सहायक आयुक्त ग. वि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी बडे, निरीक्षक कि. ध. जगदाळे यांच्या पथकाने केली.

कार्यालयातच उघड झाला प्रकार
दरम्यान, ‘अमूल’च्या कुल्फीत भेसळ असल्याचा प्रकार अन्न व औषध प्रशासनाच्या कार्यालयात उघड झाला. अधिकार्‍यांनी स्वत:ला खाण्यासाठी कुल्फी मागितली होती. कुल्फीची चव घेतल्यानंतर संशय निर्माण झाला. पॅकिंगवरील माहिती तपासली असता त्यात वनस्पती तेल व फॅटचा वापर केल्याचा उल्लेख आढळून आला. अन्नसुरक्षा व मानदे कायद्यानुसार आईस्क्रीम आणि कुल्फी या दुग्धजन्य पदार्थांमध्ये कोणत्याही प्रकारचे वनस्पती तेल किंवा फॅट वापरण्यास सक्त मनाई आहे. यामुळे अधिकार्‍यांनी तत्काळ तपासणी मोहीम हाती घेतली. नियमांनुसार कुल्फीत किमान 10 टक्के मिल्क फॅट असणे आवश्यक आहे. मात्र, जप्त करण्यात आलेल्या कुल्फींमध्ये हे प्रमाण केवळ 5.5 ते 6 टक्के असल्याची शक्यता बडे यांनी व्यक्त केली आहे. प्रयोगशाळेतील तपासणीनंतर याबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात 50 वितरक रडारवर
अहिल्यानगर शहरात ‘अमूल’ ब्रँडचे तीन अधिकृत वितरक असून, संपूर्ण जिल्ह्यात सुमारे 50 वितरक कार्यरत आहेत. या सर्वांवर आता अन्न व औषध प्रशासनाचे लक्ष केंद्रित झाले असून, लवकरच व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. तसेच त्यांना नोटीसा काढण्यात येणार आहे. नियमभंग आढळल्यास संबंधित वितरक व विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे बडे यांनी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

Shevgaon : जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड

0
शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgaon शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीतील जुने दहिफळ येथे अवैधरित्या सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर शेवगाव पोलिसांनी छापा टाकून 9 जणांना ताब्यात घेतले...