नाशिक । प्रतिनिधी Nashik
कुंभमेळ्याच्या दृष्टीने आगामी काळात वाढणार्या गर्दीचा आवाका लक्षात घेत प्रशासनाने सुरक्षेच्या उपाययोजनांवर विशेष भर देण्यास सुरुवात केली असून, विविध विभागांच्या तयारीचा सखोल आढावा घेतला जात असल्याचे विभागीय महसूल आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात कुंभमेळा आढावा बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. गेडाम यांनी नाशिक महानगरपालिका, स्मार्ट सिटी व त्र्यंबकेश्वर नगरपरिषद यांच्यातर्फे कुंभमेळ्याच्या दृष्टीने कार्यान्वित करण्यात येणार्या सीसीटीव्ही यंत्रणेचा सादरीकरणाद्वारे आढावा घेतला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा पर्वणीला 80 लाख जास्त नागरिक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने कोणतीही दुर्घटना होऊ नये यासाठी विशेष उपाययोजना केल्या जात आहेत.तसेच पोलीस आणि सुरक्षा विभागाच्या मागणीनुसार घाट परिसर, साधू ग्राम, बस स्टॉप, रेल्वे स्थानक, रामकाल मार्ग या परिसरात विशेष कॅमेरे बसवून लक्ष ठेवले जाणार आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा
सद्यस्थितीत अधिकारी स्तरावरच्या बैठका सुरू आहेत. बजेट आणि नियोजन कामाचे स्वरूप याचा आराखडा मांडला जात आहे. अंतिम टप्प्यामध्ये निर्णायक काळात लोकप्रतिनिधी व साधुसंतांच्या सोबत विचारविनिमय केला जाणार असल्याचे डॉ.गेडाम यांनी सांगितले. साधू संतांच्या अनुपस्थितीत निर्णय घेतले जाणार नाहीत. मात्र सद्यस्थितीत प्रशासनाशी संवाद साधून नियोजनच केले जात असल्याने त्या पुढच्या टप्प्यामध्ये सर्वांना समाविष्ट केले जाईल.
आग प्रतिबंधासाठी पोलीस, महानगरपालिका व आग प्रतिबंधक यंत्रणा यांनी समन्वयाने धोकादायक स्थळे निश्चित करावीत,अशाही सूचना त्यांनी केल्या. कुंभमेळा यशस्वितेसाठी येणार्या काळात प्रयागराज येथे अभ्यास दौरा आयोजित करण्यात येणार असल्याचे विभागीय आयुक्त डॉ.गेडाम यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीस जिल्हाधिकारी जलज शर्मा, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, नाशिक महानगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. माणिकराव गुरसळ, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ, जिल्हा नियोजन अधिकारी योगेंद्र चौधरी, त्र्यंबकेश्वर नगरपरिषदेच्या मुख्य अधिकारी डॉ. श्रेया देवचक्के यांच्यासह संबंधित यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
साधुग्रामला कायम जागा
नाशिकच्या तपोवनात असलेल्या साधुग्रामसाठी कायमस्वरुपी जागा उपलब्ध करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. सुमारे 400 एकर जागा अधिकृत करण्याचा मानस असल्याचे डॉ. गेडाम यांनी सांगितले. नाशिकला पूर्वी 300 एकर जागेवर साधुग्रामची उभारणी केली होती. आता कायमस्वरुपी 400 एकर जागेचे नियोजन केले जात आहे. त्र्यंबकेश्वर येथे मागील सिंहस्थात 18 एकर जागा साधू-संतांच्या वास्तव्यासाठी होती. यावेळी 32 एकर जागेचे नियोजन केले जात आहे.
पुलांचे नियोजन गतिमान
गोदावरी नदीवर विविध ठिकाणी पुलांचे बांधकाम करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी मनपाच्या माध्यमातून नियोजन केले जात आहे. घाट वाढवण्याची स्थिती त्र्यंबकेश्वरमध्ये नाही. नाशिकमध्येही अतिशय अल्प संधी आहे. त्याबाबत विचार केला जाईल, असेही डॉ. गेडाम यांनी सांगितले.