मुंबई | Mumbai
मुंबईतील कुर्ला परिसरात (Kurla Area) सोमवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास अंजुम-ए-इस्लाम शाळेजवळील एसजी बारवे रोडवर एका भरधाव वेगाने आलेल्या बसने अनेक गाड्यांना धडक दिल्याची घटना घडली. या घटनेत अनेक वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला असून अनेक निष्पाप नागरिकांना चिरडले. या अपघातात (Accident) सात जणांचा मृत्यू झाला असून जवळपास ४९ जण जखमी झाल्याचे बोलले जात आहे.अशातच आता या अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मदत जाहीर केली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या ऑफिसकडून ट्वीट करत या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. त्यामध्ये म्हटले की “कुर्ला येथे बेस्ट बसच्या अपघातात काही लोकांचे मृत्यू (Death) झाले, त्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही त्यांनी म्हटले आहे.
तसेच या घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत”, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
दरम्यान, जखमींवर (Injured) भाभा रुग्णालय, सिटी हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स रुग्णालय, हबीब रुग्णालय, सायन हॉस्पिटल, फौझिया रुग्णालय, कुर्ला नर्सिंग होम अशा विविध रुग्णालयात उपाचर सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.तर मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.