मुंबई । Mumbai
महायुती सरकाराने गेल्या जुलै महिन्यात महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना सुरु केली. या अंतर्गत महिलांना दरमहा १५०० रुपये दिले गेले. महाराष्ट्रात महायुतीची सत्ता पुन्हा आली तर या १५०० हजारांचे २१०० रुपये केले जातील असे आश्वासन महायुती सरकारने दिलं होतं. आता राज्यात महायुतीचं सहकार बहुमताने स्थापन झालंय. आता महिलांना पुढील हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत.
मात्र आता या योजनेतील लाभार्थी महिलांच्या तक्रार आलेल्या अर्जांची छाननी केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. या वृत्तानंतर राजकीय वर्तुळातून तसेच राज्यभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, खरंच अशी छाननी होणार आहे की नाही याबाबत माजी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.
आदिती तटकरे म्हणाल्या की, लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जांची छाननी करण्याचा आमचा विचार नाही. याबद्दल सुरु असलेल्या चर्चा चुकीच्या आहेत. कारण आम्ही सर्व छाननी करुन लाभार्थ्यांची निवड केली आहे. राज्यातील २ कोटी ४० लाखांहून अधिक महिलांना या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यांना या योजनेचा लाभ असाच सुरु राहणार आहे. सर्व पडताळणी करुनच लाभार्थी महिलांची निवड झाल्याचे आदिती तटकरे यांनी म्हटले आहे. तक्रार आली तर छाननी केली जाते, असे सांगत आदिती तटकरे म्हणाल्या, मी महिला आणि बालविकास विभागाची मंत्री असताना कोणीही आमच्याकडे तक्रार केली नाही. आता नव्याने जर कोणी तक्रार केली तर त्याची छाननी केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अर्जांची छाननी करण्याचे सूतोवाच केले होते. तसेच या योजनेअंतर्गत मिळणारा लाभ १५०० रुपयांवरून २१०० रुपये केला जाईल, अशी माहितीही फडणवीस यांनी दिली होती. सर्व बाबी तपासून आगामी अर्थसंकल्पात त्यासाठीच्या निधीची तरतूद करण्यावर विचार केला जाईल, असे फडणवीस यांनी सांगितले होते.