महापालिकेच्या आढावा बैठकीत खा. डॉ. विखे पाटील यांच्या सूचना
अहमदनगर (प्रतिनिधी) – केंद्र सरकारच्या निधीतून होणार्या घरकुल, पाणी, भूयारी गटार आदी योजना तातडीने मार्गी लागल्याच पाहिजेत. कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही सात सात वर्षे मुदतवाढ देणे योग्य नाही. महापालिकेत भाजपची अजून दीड वर्षे सत्ता आहे. या सत्तेच्या काळातच सर्व कामे पूर्ण करून त्याची उद्घाटने झाली पाहिजेत, अशी तंबी खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी काल दिली.
केंद्र सरकारच्या निधीतून होणार्या विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी खा. डॉ. विखे यांच्या उपस्थितीत महापालिकेत बैठक घेण्यात आली. यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे, सभागृहनेते स्वप्नील शिंदे, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष नगरसेवक महेंद्र गंधे, महिला व बालकल्याण समिती सभापती लता शेळके, उपायुक्त सुनील पवार व प्रदीप पठारे, नगरसेवक, विभागप्रमुख उपस्थित होते.
घरकुल योजनेंतर्गत बेघरांना सन 2022 पर्यंत घरकुल मिळालेच पाहिजेत, यादृष्टीने काम करण्याच्या सूचना देताना प्रत्येक योजनेतील अडचणींची माहिती त्यांनी घेतली. यामध्ये लाभार्थ्यांकडून त्यांच्या हिश्शाची रक्कम जमा होत नसल्याचे पुढे आले.
त्यामुळे आता लकी ड्रॉ काढत बसण्यापेक्षा यास व्यावसायिक रूप देण्याचे खा. विखे यांनी सांगितले. स्लम परिसरात फ्लेक्सद्वारे योजनेची माहिती, तेथे देण्यात येणार्या सुविधा आदीची माहिती जाहिरातस्वरूपात झळकविण्याचे सांगितले. ही सर्व प्रक्रिया सहा महिन्यांत संपविण्याचेही सांगितले.
शहरातील ओपनस्पेस विकसित करण्यासाठी राज्यसभा सदस्यांचा निधी आणणे, खासगी संस्थांना पुढाकार घेण्यास सांगणे असे प्रकार करण्यात येणार आहेत. त्यामुळे किमान अर्धाएकरपेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेल्या ओपनस्पेसची यादी देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. शहरामध्ये कॅन्टोन्मेंटच्या जागेवर गोकुळवाडी, रामवाडी आणि कौलारू कँप अशा तीन झोपडपट्ट्या आहेत.
जागा कॅन्टोन्मेंटची असल्याने तेथील रहिवाशी गेली अनेक वर्षे तेथे रहात असूनही त्यांच्या नावावर सात बारा उतारा झालेला नाही. यासाठी या तिनही जागा खरेदीसाठी कॅन्टोन्मेंटशी पत्रव्यवहार करण्याच्या सूचनाही केल्या.
केंद्र सरकारच्या युआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या पाणी योजनेचे काम दहा वर्षे रखडले आहे. या कामासाठी सन 2010 मध्ये कार्यारंभ आदेश दिला. 2013 ला ते पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यानंतर सतत सात वर्षे ठेकेदार संस्थेला कोणत्या आधारावर मुदतवाढ दिली, असा सवाल त्यांनी केला. हे काम आता सहा महिन्यात पूर्ण करा.
तसेच अमृत योजनेंतर्गत असलेल्या कामास नुकतीच सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे, ही शेवटची मुदतवाढ असावी, असेही त्यांनी सांगितले. महापालिकेच्या शहरात अनेक इमारती धूळखात पडून आहेत. त्यातील एक इमारत विकलांग, गतिमंद मुलांसाठी द्यावी, असेही त्यांनी सुचविले.
तर मी जनहित याचिका दाखल करेन
नेहरू मार्केट इमारत विकसित करण्याचे काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. नेमके त्यास कोण अडचण निर्माण करते? व्यक्ती विरोध करत असेल, तर विकासासाठी सर्व नगरसेवक एक का होत नाहीत? हे काम तातडीने करा, अन्यथा या विरोधात आता मीच जनहित याचिका दाखल करेन, असा इशारा खा. डॉ. विखे यांनी दिला.
महापौरांचा हातखंडा
प्रत्येकाला घर मिळावे, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न आहेत. घरकुल योजनेसाठी आणखी कुठे जागा आहे का, याचा शोध घ्या. घरकुल योजनेचे आरक्षण करण्यासाठी आपण प्रयत्न करू. महापौर वाकळे यांचा आरक्षणाच्याबाबतीत मोठा हातखंडा आहे. त्यांचीही मदत आपल्याला होईल, असा टोमणा खा. विखे पाटील यांनी मारला.
मी ना. तनपुरे यांना भेटेल
नगरविकास मंत्री म्हणून राष्ट्रवादीचे राहुरीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना त्यांच्याकडे जाण्यात अडचण वाटत असेल तर मी त्यांची भेट घेऊन निधीसाठी प्रयत्न करेन, असे खा. विखे म्हणाले.