Friday, May 3, 2024
Homeनगरसहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ

सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना पुन्हा मुदतवाढ

सध्याच्या अस्तित्वातील व्यवस्थापन समित्यांना फेब्रुवारीपर्यंत संधी

अहमदनगर – राज्य सरकारने 250 पेक्षा कमी सदस्य संख्येच्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुकांना 31 डिसेंबर 2019पर्यंत मुदतवाढ दिली होती. आता पुन्हा एकदा त्या 29 फेब्रुवारी 2020 पर्यंत पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सरकारच्या निर्णयामुळे गृहनिर्माण संस्थांमधील सध्याच्या अस्तित्वातील व्यवस्थापन समित्यांना आणखी दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे.

- Advertisement -

राज्यातील सर्वच सहकारी संस्थांच्या निवडणुका सहकार निवडणूक प्राधिकरणाच्या माध्यमातून होतात. त्यामध्ये सुमारे 80 हजार गृहनिर्माण संस्थांचा समावेश आहे. सरकारने 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांना निवडणूक प्राधिकरणाच्या कक्षेतून वेगळे करीत या सोसायटींना स्वतंत्रपणे निवडणुकीची मुभा दिली आहे. त्यासाठी सरकारने सहकार कायद्यात सुधारणा केली असली तरी 250 पेक्षा कमी सभासद असलेल्या सोसायटींच्या निवडणुका नेमक्या कशा पद्धतीने व्हाव्यात याबाबत नियम करण्यासाठी सरकारने एक समिती गठित केली आहे.

या समितीचा अहवाल येण्यास लागणारा विलंब आणि विधानसभा निवडणुका यामुळे नवीन नियम होण्यास विलंब लागणार असल्याचे सांगत यापूर्वी या निवडणुका 31 डिसेंबपर्यंत पुढे ढकलण्यात आल्या होत्या.

कर्जमाफी योजनेसाठी…
काही दिवसांपूर्वीच नागपुरात विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन झाले. त्यात अधिकारी गुंतून होते. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शेतकर्‍यांसाठी महत्त्वपूर्ण अशी महात्मा जोतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे. या योजनेचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचारी व्यग्र आहेत. या व अन्य कारणांनी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या निवडणुका घेणे दोन महिन्यांत शक्य होणार नाही. त्यामुळे या निवडणुका दोन महिने पुढे ढकलण्यात आल्या आहेत, असे सहकार खात्याने परिपत्रकात नमूद केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या