नगरकरांचे टेन्शन वाढले बाधितांचा आकडा 60
अहमदनगर (प्रतिनिधी)- शहरातील सारसनगर येथील 53 वर्षीय व्यक्ती बुधवारी सकाळी करोना बाधित आढळून आल्यानंतर सायंकाळी पुन्हा आणखी पाच व्यक्तींना करोनाची लागण झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले. त्यामुळे दिवसभरात सहा रुग्णांची भर पडली आहे. जिल्ह्यातील करोना बाधित रुग्णांची संख्या आता 60 झाली आहे. यामुळे नगरकरांचे टेन्शन वाढले आहे. दरम्यान, रात्री उशीरा आणखी सहा अहवाल प्राप्त झाले असून ते सर्व निगेटिव्ह आले होते.
दरम्यान, काल सायंकाळी बाधित आढळलेल्या पाच व्यक्तीपैकी तीन व्यक्ती या मंगळवारी करोना बाधित आढळलेल्या सुभेदार गल्ली येथील वृद्ध महिलेच्या नात्यातील आहेत, तर एक व्यक्ती या महिलेने ज्या खासगी डॉक्टरकडे उपचार घेतले, तेथील रिसेप्शनीस्ट आहे. आणखी एक व्यक्ती निघोज येथील असून या व्यक्तीचा मंगळवारीची मृत्यू झाला होता. मात्र, त्यानंतर त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पुण्याला पाठविण्यात आला होता.
बुधवारी त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली. बुधवारी सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयाकडे 11 अहवाल प्राप्त झाले होते. त्यापैकी सारसनगर येथील एका व्यक्तीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर सायंकाळी पुन्हा पाच अहवाल प्राप्त झाले. हे पाचही जण करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. सारसनगर येथील आढळलेली बाधित व्यक्ती ही व्यक्ती ड्रायव्हर असून त्याने पुणे-मुंबई प्रवास केल्याची माहिती असून या व्यक्तीला दोन दिवसापूर्वी सर्दी, खोकला याचा त्रास होऊ लागल्याने त्याला सुरुवातीला खाजगी रुग्णालयात आणि नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तसेच त्याच्या घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आला होता. काल सकाळी अहवाल प्राप्त झाल्यानंतर ही व्यक्ती करोना बाधित असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, मंगळवारी बाधित आढळलेल्या महिलेच्या निकट संपर्कातील व्यक्तींचे घशातील स्त्राव तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यात या महिलेचा मुलगा, सून आणि शेजारी यांनाही करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले. तसेच त्या महिलेने ज्या खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले होते, तेथील रिसेप्शनीस्टही बाधित आढळून आली.
दरम्यान, पारनेर तालुक्यातील निघोज येथील एका व्यक्तीचा काल मृत्यू झाला होता. त्याचा अहवालही काल पॉझिटीव्ह आला. दरम्यान, जिल्हा प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेने तात्काळ पावले उचलून या परिसरात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेतल्या असून या व्यक्तींच्या संपर्कातील व्यक्तींची माहिती घेतली जात आहे.
ग्रीन झोनमधून येणार्या सुट द्या : पद्मश्री पवार
जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार आता शेजारील गावातून आपल्या गावात आलेल्या पाहुण्यांनासुद्धा क्वारंटाईन करण्यात येत आहे. शेजारील गावातील पाहुणे 1 ते 2 दिवसांसाठी ये जा करत असतात. मात्र, बाहेरून हॉटस्पॉट किंवा रेड झोनमधून आलेल्या नागरिकांची तपासणी करून त्यांना त्यांच्या स्वतच्या घरीच कोरोंटाईन करण्यात यावे, सध्या शहरातून खेड्याकडे येणार्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.त्यामुळे ग्रामीण भागातसुद्धा कोरोनाची लागण होऊ शकते. तसेच ग्रामीण भागातील शिस्तीचा भंग होवून वादविवाद वाढतील. त्यामुळे आतापर्यत सुरक्षित असलेली गावेसुद्धा असुरक्षित होऊ शकतात. 30 मे पर्यंत लॉकडाऊन शिस्तीने पाळलयास करोना आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल. तसेच ग्रामपंचायतीकडे अत्यावश्यक सोयी सुविधा उपलब्ध नाहीत. रेड झोनमधून आलेल्यांना प्राथमिक शाळेत ठेवण्यात येते ते सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नाही. तसेच ग्रीन झोनमधून आलेल्या नागरिकासाठी संस्थात्मक विलीगीकरणाचा आदेश शिथिल करण्यात यावा, अशी मागणी आदर्श गाव योजनेचे कार्याध्यक्ष तथा पद्मश्री पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्री आणि ग्रामविकास मंत्र्यांकडे केली आहे.
सारांश
एकूण करोना बाधीत 60
करोना मुक्त 40
मृत पावलेले 4
उपचार सुरू असणारे 16
सारसनगरला धोक्याची घंटा
करोना झालेला ड्रायव्हर हा सारसनगरमधील शांतीनगरात राहतो. त्याच्याकडे छोटे वाहन असून त्यातून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करतो. त्याला त्रास झाल्यावर त्यांने सारसनगरमधील ज्या दवाखान्यात उपचार घेतले त्या दवाखान्यात पाच जणांचा स्टाफ आहे. हे सगळेच शांतीनगर, सारसनगर भागात राहतात. ज्या डॉक्टरांच्या दवाखान्यात हा पेशंट अॅडमीट होता, त्या दवाखान्याचे डॉक्टर हे शहरातील प्रतिष्ठीतांचे नातलग आहेत. त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाला प्रतिष्ठित नातलगांनी हजेरी लावल्याने ही चेन मोठी पांगली असावी, असे सूत्रांकडून समजते. त्यामुळेच सारसनगरला धोका असल्याची चर्चा आहे.
सुभेदार गल्लीचा धोका वाढला
शहरातील सुभेदार गल्लीमधील वृध्देचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देखील त्या वृध्देच्या मुलांना मनपा आरोग्य विभागाच्या चुकीमुळे स्त्राव तपासणीसाठी स्वत:च्या दुचाकीवर जिल्हा रुग्णालयात जावे लागले. आता त्यापैकी काहीजण पॉझिटिव्ह आले असल्याने अनेकांचा धोका वाढला आहे. याला केवळ मनपा प्रशासन जबाबदार असून सुभेदार गल्लीचा धोका वाढला आहे.




