बाधितांमध्ये नगर आणि सुप्यातील प्रत्येकी एक । जिल्ह्याचा आकडा 232
अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्ह्यात बुधवारी नव्याने सहा करोना बाधित रुग्ण समोर आले आहेत. यामुळे जिल्ह्यातील बाधितांचा आकडा 232 वर पोहचला असून यासह 20 रुग्णांनी करोनावर मात केली आहे. त्यात एका 85 वर्षांच्या आजीबाईंचा समावेश आहे. यामुळे करोना मुक्त झालेल्याची संख्या देखील 161 वर पोहचली आहे
बुधवारी जिल्हा रुग्णालय कोरोना टेस्ट लॅबमध्ये सकाळी एक व्यक्तींचा करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आढळून आला. तर दिवसभरात संगमनेर येथील चार रुग्ण आणि नगर शहरातील कायनेटिक चौक येथील एका रुग्णांचा खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीचा अहवालात पॉझिटिव्ह आढळून आला.
सकाळी जिल्हा रुग्णालयालच्या लॅबमध्ये पॉझिटिव्ह आलेला रुग्ण हा पारनेर तालुक्यातील सुपा एमआयडीसीतील खाजगी कंपनीतील व्यवस्थापक आहे. तो दिल्लीहून प्रवास करून आला होता. त्याला क्वारंटाईन करण्यात आले होते. सर्दीचा त्रास होत असल्याने त्याची तपासणी करून घेतली असता त्याचा अहवाल बाधित आला आहे.
यासह संगमनेर येथील खासगी प्रयोग शाळेतील पॉझिटिव्ह आलेल्या चार रुग्णांपैकी एक रुग्ण हा निमोण येथील आहे. तर उर्वरित संगमनेर शहरातील आहेत. नगर शहरात पॉझिटिव्ह आढळून आलेली महिला ही एका खाजगी रुग्णालयात काम करत होती. संगमनेरच्या चार आणि नगरमधील एका अशा पाच खासगी प्रयोग शाळेतील करोना पॉझिटिव्ह अहवाल यांची जिल्हा रुग्ण संख्येत वाढ करण्यात आली.
यामुळे जिल्ह्यातील बाधितांची संख्या 232 आल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. बापूसाहेब गाडे यांनी दिली. दरम्यान, बुधवारी सकाळी 20 रुग्णांना वैद्यकीय तपासणीनंतर बूथ हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये अकोले 7, नगर महापालिका क्षेत्रातील 7, संगमनेर 4, राहाता 1 आणि श्रीगोंदा येथील एक यांचा यात समावेश आहे. यामुळे आतापर्यंत जिल्ह्यातील कोरोनातून बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची संख्या 161 झाली आहे.
जिल्ह्यात बुधवारीरात्रीपर्यंत 60 अॅक्टिव्ह केसेस होत्या. जिल्हा आरोग्य यंत्रणेने 3 हजार 141 संशयीत करोना रुग्णांच्या स्त्रावाची तपासणी केली असून यातील 2 हजार 865 नमुने निगेटिव्ह आले आहेत. जिल्ह्यातील पॉझिटिव्ह रुग्णांपैकी महानगरपालिका क्षेत्र 50, उर्वरित जिल्हा 121, इतर राज्य 2, इतर देश 8 आणि इतर जिल्हा 50 असे आहेत.




