नाशिक | प्रतिनिधी | Nashik
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) (Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme) म्हणजेच जी रामजी योजनेअंतर्गत काम करणाऱ्या मजुरांसाठी केंद्र सरकारने (Central Government) एक दिलासादायक निर्णय घेतला आहे. सरकारने दैनिक मजुरीत ५ रुपयांची वाढ जाहीर केली आहे.
बुधवार (१ जुलै) पासून ही वाढ लागू झाली असून, यापूर्वी ३१२ रुपये मिळणाऱ्या मजुरांना आता प्रतिदिन ३१७ रुपये मजुरी (Wages) मिळणार आहे. यामुळे महिनाभर नियमित काम करणाऱ्या मजुरांच्या उत्पन्नात सुमारे १५० रुपयांची वाढ होणार आहे. जी रामजीयोजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला (Family) वर्षातून १०० दिवस रोजगाराची हमी दिली जाते. ग्रामीण भागात रस्ते, विहिरी, पाझर तलाव, नाला बांधकाम, फळबाग लागवड, घरकुल, गोठे आदी विकासकामे या योजनेतून केली जातात. राज्यभरात दररोज ५ ते ७ लाख मजूर या योजनेत काम करतात.
नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) बागलाण, निफाड, सुरगाणा, इगतपुरी आदी तालुक्यांमध्ये या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ४० कोटी रुपयांचा निधी खर्च झाला असून, त्यापैकी ३१ कोटी रुपये अकुशल मजुरांच्या मजुरीवर तर ९ कोटी रुपये कुशल कामांवर खर्च झाले आहेत. मजुरी वेळेवर मिळावी यासाठी केंद्र सरकारने राज्ये व केंद्रशासित प्रदेशांसाठी ९५ हजार ६९२ कोटी रुपयांहून अधिक निधी उपलब्ध करून दिला आहे. वाढीव मजुरीमुळे ग्रामीण भागातील कामगारांच्या आर्थिक स्थितीला मोठा आधार मिळणार आहे.




