आज अखेर करावे लागणार अर्ज
संगमनेर (वार्ताहर)- राज्यातील आदिवासी विभागाच्यावतीने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी केंद्रीय बोर्डाशी संलग्न असलेल्या एकलव्य इंग्रजी माध्यमातील शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. सदरची परीक्षा 15 मार्च रोजी घेण्यात येणार आहे.
राज्यात आदिवासी विभागाच्यावतीने 25 एकलव्य इंग्रजी माध्यमाच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. या शाळांमध्ये निवासी व्यवस्था, करण्यात आली असून भोजन, व इतर सुविधा मोफत पुरविण्यात येत आहेत. राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, आदिवासी आश्रमशाळा अनुदानित शाळांमध्ये इयत्ता पाचवीच्या वर्गात शिकणारे विद्यार्थी सहावीच्या वर्गात प्रवेश मिळवण्यासाठी यावर्षी परीक्षा देऊ शकणार आहेत. यासाठी 31 जानेवारीपर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहेत.
ज्यांनी आदिवासी विभागाच्या प्रकल्प कार्यालयात यापूर्वी अर्ज सादर केले असतील त्यांना पुन्हा अर्ज सादर करण्याची गरज असणार नाही. राज्यात इयत्ता सहावीसाठी चौदाशे विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. मात्र या पूर्वीच्या प्रवेश प्रक्रियेतून रिक्त राहिलेल्या सातवी, आठवी व नववीतील विद्यार्थ्यांना देखील प्रवेश दिला जाणार आहे. इयत्ता सातवीसाठी 450 जागा रिक्त असून, आठवीसाठी शंभर व नववीसाठी पन्नास जागा रिक्त आहेत. त्या इयत्तांच्या प्रवेशासाठी देखील विद्यार्थी प्रवेश अर्ज सादर करू शकणार आहेत.
ज्या पालकांचे उत्पन्न सहा लाख रुपयांपेक्षा कमी आहे अशाच पालकांच्या पाल्यांना या परीक्षेसाठी पात्र ठरविले जाणार आहे. आदिवासी आश्रमशाळांमध्ये शिकणार्या व एकलव्य इंग्रजी माध्यमासाठी ऑनलाईन परीक्षा देऊ पाहणार्या विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रावर नेणे व आणणे यासाठीची सुविधा आश्रम शाळेच्या मुख्याध्यापकांनी करावयाची आहे. यासाठीचा खर्च त्यांनी स्थानिक खर्चातून करावयाचा आहे , तर इतर शाळांना मात्र हा खर्च स्वतः अथवा पालकांना करावा लागणार आहे .
महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विभागाच्यावतीने राज्यात सीबीएससी बोर्डाशी संलग्न असणार्या 25 शाळा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्यातील अहमदनगर जिल्ह्यात मवेशी याठिकाणी एकमेव शाळा आहे. या ठिकाणी यावर्षी इयत्ता सहावीसाठी तीस मुली व तीस मुले यांना प्रवेश देण्यात येणार आहे.