Friday, May 3, 2024
Homeनगरबेकायदा रस्ते खोदाईप्रकरणी महानेटकडून भरपाई घेण्याचा ठराव

बेकायदा रस्ते खोदाईप्रकरणी महानेटकडून भरपाई घेण्याचा ठराव

जिल्हा परिषद स्थायी समितीचा निर्णय

अहमदनगर (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेच्या मालकीच्या रस्त्यांचे महानेट कंपनीने ग्रामपंचायती जोडा कार्यक्रमात बेकायदेशीरपणे खोदाई केलेली आहे. यामुळे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे मोठे नुकसान झालेले असून याप्रकरणी संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई घेण्याचा निर्णय जिल्हा परिषद स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

- Advertisement -

राजश्रीताई घुले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी स्थायी समितीची बैठक पार पडली. यावेळी हा विषय उपस्थित करण्यात आला. महानेट कंपनीने ग्रामपंचायत जोडो कार्यक्रमात रस्त्यांच्या कडेला खोदकाम करून केबल टाकली आहे. हे करत असताना रस्त्याच्या मध्यभागावरून 15 फूट लांबीवर केबल टाकणे आवश्यक असताना महानेटने रस्त्याच्या साईडपट्ट्या आणि काही ठिकाणी डांबरी रस्तेच फोडून टाकले आहेत.

यासह जिल्हा परिषदेच्या रस्त्यांच्याकडेला असणारी झाडे तोडून टाकली आहेत. यासाठी जिल्हा परिषदेची परवानगी घेतलेली नाही. यामुळे जिल्हा परिषदेच्या रस्त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. यामुळे जिल्हा परिषद तातडीने प्रस्ताव तयार करून जिल्हाधिकार्‍यांना सादर करणार असून महानेटकडून भरपाई घेणार आहे.

मिरी-तिसगाव, बुर्‍हाणनगर व इतर गावे प्रादेशिक पाणी योजनांची पाणीपट्टी वसूल होणे आवश्यक आहे. ही वसुली संबंधित गटविकास अधिकारी यांनी तात्काळ करून सर्व ठिकाणी वॉटर मिटर बसविण्यात यावेत, 100 टक्के वसुली न झाल्यास संबंधित गावच्या सरपंच, ग्रामसेवक, उपअभियंता आणि गटविकास अधिकारी यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश बैठकीत देण्यात आलेत.

अनुकंपा भरतीमधील पात्र कर्मचार्‍यांना तात्काळ नेमणुका देण्यात याव्यात. कोरोना विषाणूच्या संसर्गाबाबत कोणत्याही अफवांना घाबरून न जाता, परदेशातून आलेल्या व्यक्तीबाबत तात्काळ सरकारी आरोग्य संस्थेला माहिती कळविण्यात यावी आदी सूचना देण्यात आल्या.
सभेला उपाध्यक्ष प्रताप शेळके, सभापती सुनील गडाख, काशिनाथ दाते, मीरा शेटे, उमेश परहर, सदस्य संदेश कार्ले, अनिल कराळे, सदाशिव पाचपुते, अनिता हराळ, महेश सूर्यवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोलंकी आदी उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या