Friday, November 15, 2024
Homeनगरशॉर्टसर्किटने पोल्ट्री फीड मिलला आग

शॉर्टसर्किटने पोल्ट्री फीड मिलला आग

सव्वा कोटीचे नुकसान ; चिंचोली गुरव शिवारातील घटना

तळेगाव दिघे (वार्ताहर) – संगमनेर तालुक्यातील चिंचोलीगुरव शिवारात विजेच्या शॉर्टसर्किटने पोल्ट्री फीड मिलला आग लागून मशिनरी, साहित्य, कच्चा माल जळून खाक झाला. आगीत अंदाजे सव्वा कोटी रुपयांहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले. ही घटना काल मंगळवारी पहाटे 4.30 च्या सुमारास घडली.

- Advertisement -

चिंचोलीगुरव शिवारातील गट क्रमांक 245 मध्ये तुकाराम सखाहरी सोनवणे यांच्या मालकीच्या शेतात पोल्ट्री फार्म आहे. नजीकच त्यांच्या आई मंजुळाबाई सखाहरी सोनवणे यांच्या नावे असलेली पोल्ट्री फीड मिल आहे. मंगळवारी पहाटे 4.30 च्या सुमारास शॉर्टसर्किटने सदर पोल्ट्री फिड मिलला अचानक आग लागली. आगीत गोडाऊनमधील फीड मिल मशिनरी, जनरेटर, 12 टन सोया, 80 टन मका, डीओआरबी पावडर, मार्बल, औषधे, पोल्ट्री फार्मचे खाद्य आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाले. आगीत अंदाजे सव्वा कोटी कोटी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले. पोल्ट्री फीड मिलला आग लागल्याचे कळताच तुकाराम सोनवणे, संगमनेर पंचायत समितीचे माजी सभापती अविनाश सोनवणे, राजहंस ट्रान्सपोर्टचे अध्यक्ष हौशीराम सोनवणे, योगेश सोनवणे, जगन्नाथ सोनवणे, रोहिदास सोनवणे, संजय खिलारी, डॉ. सुहास आभाळे, विलास सोनवणे, नामदेव सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेतली.

स्थानिक रहिवासी व युवकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर थोरात साखर कारखाना व संगमनेर नगरपालिकेच्या अग्निशामक दलामार्फत आग विझविण्यात आली, मात्र तोपर्यंत मशिनरी व साहित्य जळून खाक झाले होते. आगीत झालेल्या नुकसानीची थोरात साखर कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी पाहणी केली. याप्रकरणी तुकाराम सोनवणे यांनी पोलिसांत खबर दिली. त्यानुसार संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात जळीताच्या घटनेची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या