पर्यटन व्हिसाचा गैरवापर : तिघा भारतियांचा जामीन
अहमदनगर (प्रतिनिधी)- पर्यटन व्हिसाचा गैरवापर करून दिल्ली येथील तबलिगी जमातीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन जिल्ह्यात वास्तव केलेल्या दोन परदेशी नागरिकांना न्यायालयाने 13 मे पर्यंत पोलीस कोठडी दिली. तर, त्यांच्यासोबत असलेल्या तिघा भारतीय नागरिकांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांनी जामीन मंजूर केला आहे.
अटक केलेल्या दोघा परदेशी नागरिकांना करोनाची लागण झाली होती तर तिघा भारतियांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. गुरुवारी (दि. 7) या परदेशी नागरिकांना रुग्णालयातून सोडण्यात आले तर तिघा भारतियांचा क्वारंटाईन कालावधी संपला होता. परदेशी नागरिकांचा तपास असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी पाच जणांना अटक केली. त्यांना शुक्रवारी (दि. 8) सकाळी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने दोघा परदेशी नागरिकांना 13 मे पर्यत पोलीस कोठडी दिली. तर तिघा भारतियांना जामीन मंजूर केला.
दोघे परदेशी इंडोनेशिया व जैबुती येथील आहे. तर, भारतीय राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेशातील आहे. यापूर्वी 26 परदेशी व तीन भारतियांना अटक करण्यात आली आहे. ते सर्व पारनेरच्या कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. दिल्ली येथील धार्मिक कार्यक्रमासाठी जैबुती, फ्रान्स, आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया या देशातून 29 परदेशीय व सहा भारतीय असे 35 जण नगर शहर, नेवासा, जामखेड येथे राहिले होते.
त्यांच्या विरोधात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील काही जणांना करोनाची लागण झाली होती. तर, काही जणांना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यातील 26 परदेशी व तीन भारतियांना यापूर्वीच अटक करण्यात आली होती. गुरुवारी पुन्हा पाच जणांना अटक झाली. यामुळे आतापर्यंत 28 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली आहे. सध्या एक परदेशी नागरिक क्वारंटाईन आहे.




