Friday, May 3, 2024
Homeनगरखुलेआम विक्रीः शालेय विद्यार्थी व्यसनाधीन

खुलेआम विक्रीः शालेय विद्यार्थी व्यसनाधीन

संगमनेरात अवैध गुटखा विक्रीतून लाखोंची उलाढाल

संगमनेर (शहर प्रतिनिधी) – संपूर्ण राज्यात गुटखा विक्रीला बंदी असताना संगमनेर शहर व परिसरात मात्र वेगवेगळ्या प्रकारच्या गुटख्याची खुलेआम विक्री सुरू आहे. या व्यवसायातून दररोज लाखोंची उलाढाल होत आहे. शाळा महाविद्यालयाच्या परिसरात सहजरित्या गुटखा मिळत असल्याने अनेक विद्यार्थी व्यसनाधीन झाले आहे. मुलांच्या गुटखा सेवनामुळे पालक चिंताग्रस्त झाले आहे.

- Advertisement -

राज्यात गुटखा बंदी कायदा अंमलात आल्यानंतर गुटखा उत्पादक कंपन्यांना आपला गाशा गुंडाळावा लागला. ओरिजनल गुटख्याऐवजी नंतर बाजारात डुब्लीकेट गुटख्याच्या पुड्या विक्रीसाठी आल्या आहे. संगमनेरात गुटखा विक्री करणारे चौघे मोठे व्यापारी असून त्यांच्या गोदामात कायम गुटख्याचा मोठा साठा उपलब्ध असतो.

सर्व गोदाम शहराबाहेर असून याकडे संबंधित खात्याचे दुर्लक्ष होत आहे. हे व्यापारी आपल्या हस्तकांंच्या मदतीने शहरातील पान टपर्‍यांवर गुटखा विक्रीसाठी पाठवतात यातून त्यांची दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.

शहरातील विविध पानटपर्‍यात अनेक प्रकारचा गुटखा महागड्या भावात विकला जात आहे. 15 ते 20 रुपये अशा दराने गुटख्याची विक्री होत आहे.शहरातील वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयासमोर व परिसरात पानटपर्‍या अस्तित्वात आहे. शालेय विद्यार्थी या टपर्‍यांंमधून गुटख्याच्या पुड्या खरेदी करतात. ऐन परीक्षेच्या कालावधीतही विद्यार्थी गुटखा खाऊन परीक्षेसाठी जात असल्याचे चित्र आहे. गुटखा विक्रीमुळे युवा पिढी उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर असतानाही याकडे अधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे.

अन्न व भेसळ प्रतिबंधक खात्याच्या अंतर्गत गुटखा विक्रीचा संबंध येतो. मात्र शहरातील या खात्याच्या अधिकार्‍यांची गुटखा विक्रेत्यांशी मिलीभगत असल्याने त्यांचे या अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष होत आहे. या खात्याचे नगर येथील वरिष्ठ अधिकारीही संगमनेरात फिरकत नाही. यामुळे गुटखा विक्रेत्यांचे चांगलेच फावले आहे.

पोलीस खात्याचा संबंध नसतानाही पोलीस अधिकारी या व्यवसायात हस्तक्षेप करीत असल्याने हा चर्चेचा विषय बनला आहे. शहर व परिसरात सुरू असलेल्या गुटखा विक्रीबाबत वरिष्ठ अधिकार्‍यांनी लक्ष घालून गुटखा विक्रेत्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या