Friday, July 3, 2026
Homeनगरके. के. रेंज प्रश्नात राजकारण, न्यायालात जाणार

के. के. रेंज प्रश्नात राजकारण, न्यायालात जाणार

खा. डॉ. सुजय विखे : महापालिकेतील भाजपबाबत व्यक्त केली नाराजी

अहमदनगर (प्रतिनिधी)- महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी महापालिकेतील कोणतीच गोष्ट नगरसेवक अन् प्रशासन मला कळवित नसल्यामुळे विकासाच्या योजना मार्गी लावण्यात अडचणी येतात, अशा स्पष्ट शब्दात खा. डॉ. सुजय विखे यांनी महापालिकेतील स्वपक्षीय सत्ताधार्‍यांबद्दल नाराजी व्यक्त केली. तसेचे राहुरी, नगर आणि पारनेर तालुक्यातील के. के. रेंज प्रश्नात राजकारण घुसले असून हा प्रश्न सोडविण्यासाठी प्रसंगी न्यायालयात जाऊ, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

खा. डॉ. विखे पाटील नगर येथे पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, शहराच्या प्रश्नासंदर्भात अनेकदा महापालिकेत केंद्र सरकारच्या योजनेचा आढावा घेतो. त्यावेळी कोणत्याही अडचणी अधिकारी मला सांगत नाहीत. पाण्याच्या लाईन संदर्भात अडचण समजल्यानंतर मी थेट त्या अधिकार्‍याकडे विचारणा केली. तो प्रश्न निकाली काढण्यासाठी एकाची नियुक्ती केली. मात्र, वर्षभरापासून त्या कामाची फाईल तेथेच पडली आहे.

गेल्या वर्षभरात नगर दक्षिण मतदार संघामध्ये महत्त्वाची कामे मार्गी लावली. के. के. रेंजसाठी जमीन द्यायची की नाही याबाबत तीस वर्षांपासून त्यावर राजकारण सुरू आहे. के. के. रेंजच्या जमिनीचा प्रश्न सुटावा, तसेच शेतकर्‍यांना न्याय मिळावा यासाठी त्यांना सोबत घेत न्यायालयात जाऊ. राज्याच्या विकासासाठी लष्कराने राज्यभरात 200 ते 300 एकर जमीन दिली.

पण त्याचा बदला म्हणून राज्य सरकारने संरक्षण खात्याला रुपयाही दिला नाही. त्यामुळे आता के. के रेंजच्या जमिनीचे पैसे लष्कर कसे देणार, हा प्रश्न आहे. आता ही जबाबदारी नेमकी कोणाची आहे, हे ठरवावे लागणार आहे. यातून मार्ग निघाला तर ठिक अन्यथा शेतकर्‍यांच्यावतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचे खा. डॉ. विखे म्हणाले.

उड्डाणपूल मार्गी लावणारच
कोणत्याही परिस्थितीमध्ये उड्डाणपुलाचा विषय मार्गी लावणारच, असा दावा खा. विखे यांनी केला. उड्डाणपुलासाठी लागणार्‍या लष्कराच्या जागेला मोबदला द्यायचा, की जागेला जागा द्यायची हा प्रश्न होता. पण आता केंद्र सरकारने बदलेल्या धोरणानुसार जागेच्या मोबदल्यात पैसे न देता लष्कर ज्या ठिकाणी एखादे बांधकाम करून द्या, असे सांगेल तेथे बांधकाम करून देण्यात येणार आहे. लष्कराने कॅन्टोन्मेंटच्या रहिवासी निवासाचे बांधकाम करून देण्याचे सांगितले आहे. त्यामुळे आता तोही विषय मार्गी लागल्याने उड्डाणपुलासाठी लष्कराची जागा मिळून उड्डाणपुलाच्या कामाला सुरूवात होईल, असे खा. डॉ. सुजय विखे म्हणाले.

ताज्या बातम्या

गंगापूर

Nashik News: जूनमध्ये पावसाने ओढ दिल्यानंतर जुलैत दमदार पावसाची अपेक्ष, गंगापूर...

0
नाशिक । प्रतिनिधीजिल्ह्यातील धरणसाठ्यांत गतवर्षीच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, यात गोदावरी खोऱ्यातील धरणसमूहात गतवर्षाच्या जून अखेरच्या तुलनेत तब्बल २६.६३ टक्के जलसाठ्याची तूट...