Sunday, July 26, 2026
HomeराजकीयUddhav Thackeray : राम मंदिरातील चोरीविरोधात उद्धव ठाकरे स्वतः मैदानात, असा आहे...

Uddhav Thackeray : राम मंदिरातील चोरीविरोधात उद्धव ठाकरे स्वतः मैदानात, असा आहे आंदोलनाचा मेगाप्लॅन!

मुंबई । Mumbai

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिराच्या उभारणीत कोट्यवधी भाविकांनी अर्पण केलेल्या दानामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने आता थेट रणांगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

- Advertisement -

राम मंदिरातील या कथित ‘दान चोरी’विरोधात ठाकरे गटाने राज्यभरात आक्रमक आंदोलनाची हाक दिली असून, येत्या रविवारी म्हणजेच ५ जुलै रोजी मुंबईतील ऐतिहासिक दादर भागात जाहीर ‘रामरक्षा आंदोलन’ करण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज केली. विशेष म्हणजे, या आंदोलनाचे नेतृत्व स्वतः उद्धव ठाकरे करणार आहेत.

गेल्या काही काळापासून राजकीय पातळीवर अनेक अंतर्गत बंडाळ्या आणि धक्के सहन करणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सत्ताधाऱ्यांवर थेट आणि अत्यंत तीक्ष्ण हल्ला चढवला. राजकीय विश्लेषकांच्या मते, या नव्या आंदोलनाच्या घोषणेमुळे ठाकरे गट पुन्हा एकदा आपल्या मूळ आणि आक्रमक ‘हिंदुत्वाच्या’ वाटेवर परतत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे अत्यंत आक्रमक पवित्र्यात दिसले. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या एका प्रसिद्ध विधानाचा संदर्भ देत ते म्हणाले, “एक काळ असा होता जेव्हा वाजपेयी म्हणाले होते, ‘अब हिंदू मार नही खायेगा’. पण आज परिस्थिती बदलली आहे, राम मंदिराच्या पवित्र पैशावर दरोडा टाकला जात आहे. त्यामुळे आता मी म्हणेन, ‘अब हिंदू माफ नही करेगा!’ या अन्यायाविरोधातील संघर्षाची सुरुवात आम्ही येत्या रविवारपासून दादर येथील मारुती मंदिरापासून संध्याकाळी ठीक ४ वाजता ‘रामरक्षा स्तोत्र’ पठण करून करणार आहोत.”

भाजपच्या सत्तेच्या केंद्रस्थानावर प्रहार करताना ठाकरे म्हणाले की, भाजपच्या आजच्या अथांग आणि अमर्याद सत्तेचे मूळ हे कारसेवकांनी आणि शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी करून उभारलेल्या राम मंदिर आंदोलनात आहे. गोध्रा हत्याकांड, अहमदाबादमधील दंगली आणि मुंबईतील बॉम्बस्फोटांमध्ये देशातील आणि राज्यातील सामान्य हिंदू जनतेने प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या. या संघर्षाचे भांडवल करून, कधीकाळी संसदेत अवघ्या दोन जागा असणाऱ्या भाजपने आपला ‘गांधीवादी समाजवाद’ बाजूला सारून राम मंदिराच्या मुद्द्याला हात घातला आणि आज ते सत्तेचा उपभोग घेत आहेत.

उद्धव ठाकरे यांनी सध्याच्या राजकारणावर ‘ऑपरेशन लोटस’वरून बोचरी टीका केली. “आज देशात आमदार आणि खासदार फोडण्याचे सत्र सुरू आहे, ज्याला ‘ऑपरेशन’ असे नाव दिले जाते. पण हा लोकशाहीचा खून करण्यासाठी लागणारा पैसा येतो कुठून? राम मंदिराच्या पवित्र दानावर दरोडा टाकून तोच पैसा इतर पक्ष फोडण्यासाठी वापरला जात आहे का? भाजप आता ‘ऑपरेशन राम मंदिर’ राबवत आहे का?” असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला.

देशात आणि राज्यात सध्या अनेक जनसामान्यांच्या व्यथा भेडसावत असताना, सत्ताधारी मात्र केवळ सत्तेच्या राजकारणात मश्गूल आहेत. देशात कमालीचा गोंधळ उडाला असून कोणाचेही कोणाप्रति उत्तरदायित्व राहिलेले नाही. त्यामुळे आता भाजपच्या सत्तेच्या मुख्य मुळावरच आघात करण्याची वेळ आली असून संपूर्ण देशातील हिंदूंनी या दरोडेखोरीविरोधात जागे व्हावे, असे आवाहन ठाकरेंनी या पत्रकार परिषदेत केले.

ताज्या बातम्या

विशेष संपादकीय : २६ जुलै २०२६ – सत्तेचा अहंकार अखेर धराशायी!

0
दिल्लीच्या सत्तेत बसलेल्यांना वाटत होते की, देश आपल्याच तालावर नाचतो. विरोधकांचे आवाज दडपणे, शेतकर्‍यांच्या आंदोलनाला दुर्लक्षित करणे आणि उंटावरून शेळ्या हाकत जनक्षोभाला उडवून लावणे...