पुणे । Pune
केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला आता एक अत्यंत धक्कादायक आणि नवे वळण मिळाले आहे. या संपूर्ण गुन्ह्याचा कट आधीपासूनच माहिती असलेला एक तिसरा तरुण पोलिसांच्या रडारवर आला असून, पुणे ग्रामीण पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. मुख्य संशयित आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची पोलीस कोठडी आज संपत असल्याने त्यांना दुपारी अडीचनंतर वडगाव मावळ न्यायालयात हजर केले जाणार आहे. या महत्त्वपूर्ण सुनावणीच्या काही तास आधीच हा सर्वात मोठा खुलासा समोर आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ताब्यात घेण्यात आलेला तरुण हा मुख्य आरोपी चेतन चौधरी याचा महाविद्यालयीन वर्गमित्र आहे. धक्कादायक बाब म्हणजे, केतनच्या हत्येचे संपूर्ण नियोजन चेतन आणि सिया या दोघांनी या मित्रासोबत आधीच डिस्कस केले होते. इतकेच नव्हे तर, घटना घडली त्या दिवशी म्हणजेच १८ जून रोजी या दोघांनी त्याला लोहगडावर सोबत चालण्याचा प्रचंड आग्रह केला होता. मात्र, तो तरुण त्या दिवशी लोहगडावर गेला नाही. पुढे धक्कादायक बाब अशी समोर आली की, केतनचा गुन्हा केल्यानंतर चेतन सर्वात आधी याच मित्राला भेटला होता, तर सिया देखील त्याच्याशी बोलली होती, अशी तांत्रिक माहिती तपासात उघड झाली आहे.
हा तरुण मूळचा बीड जिल्ह्यातील असून, सध्या तो पुण्याच्या बालेवाडी परिसरातील एका खासगी कंपनीत नोकरी करतो. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून तो चेतनच्या सातत्याने संपर्कात होता. विशेष म्हणजे, प्राथमिक चौकशीत या तरुणाने चेतन आणि सियाला “हे कृत्य करू नका”, असा सल्ला दिल्याचा दावा केला आहे. मात्र, इतकी मोठी माहिती असूनही ती पोलिसांपासून लपवून ठेवल्याने पोलीस आता त्याची कसून चौकशी करत आहेत. पोलिसांना सुरुवातीपासूनच या कटात आणखी कोणाचा तरी सहभाग असल्याचा संशय होता, जो आता तपासाअंती खरा ठरला आहे.
गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत पोलिसांनी अनेक महत्त्वाचे धागेदोरे गोळा केले असून ते आज न्यायालयात सादर केले जातील. पूर्वी गाजलेल्या नसरापूर येथील भीमराव कांबळे प्रकरणाच्या धर्तीवर, पुणे ग्रामीण पोलीस या प्रकरणातही सीसीटीव्ही फुटेज आणि अन्य तांत्रिक पुराव्यांच्या आधारे न्यायालयात ‘लास्ट सीन टुगेदर’ (शेवटच्या वेळी एकत्र दिसणे) ही महत्त्वपूर्ण थिअरी मांडणार असल्याचे समजते.
दरम्यान, तपासाच्या प्रक्रियेदरम्यान आरोपी सिया गोयल हिचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे ग्रामीण पोलीस जेव्हा सियाला घेऊन पुण्याच्या निवासस्थानी घटनेच्या दिवशीचे तिचे कपडे जप्त करण्यासाठी गेले होते, तेव्हा घरातून बाहेर पडताना माध्यमांचे कॅमेरे पाहताच सियाने अत्यंत आक्षेपार्ह आणि उर्मट हावभाव केले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर समोर आला असून, अत्यंत गंभीर गुन्ह्यातील आरोपी असूनही तिच्या चेहऱ्यावर कोणताच पश्चात्ताप न दिसल्याने, तिच्या या मुजोरपणावर आणि वर्तनावर सर्वच स्तरातून प्रचंड तीव्र शब्दांत टीका आणि संताप व्यक्त केला जात आहे. आजच्या न्यायालयीन सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.




