Friday, May 3, 2024
Homeनगरलॉकडाऊनमुळे शेती औजारे विक्रीविना पडून

लॉकडाऊनमुळे शेती औजारे विक्रीविना पडून

कारागिरांना उदरनिर्वाह करणे झाले कठीण

नेवासा बुद्रुक (वार्ताहर)- रणरणत्या उन्हात अंगातून घामाच्या धारा वाहत असताना लोखंडाचें पाणी करून विळ्याचा आकार येईपर्यंत लोखंडावर घावं घालणारे चित्र ग्रामीण भागात पहायला मिळते. मात्र लॉकडाऊनमुळे अतिशय बिकट परिस्थिती सध्या या व्यावसायीकांवर आलेली पहायला मिळत आहे. हातांवर उपजिविका भागवण्यार्‍या घिसाडी समाजाच्या या व्यवसायीकांनी बनवलेल्या शेतीउपयोगी औजारे, साधनांना मोठी मागणी असली तरी करोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकरी सुद्धा हवालदिल झाला असल्याने या लोकांकडे शेतकर्‍यांनी देखील पाठ फिरवली आहे त्यामुळें त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.

- Advertisement -

नेवाशातील विळा, कोयता, खुरपे, कुदळ, टिकाव आदी शेतीविषयक वस्तूंना जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरून देखील मोठी मागणी आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग विळे खरेदीसाठी शहरातील दोन-तीन दुकानांमध्ये मोठी गर्दी करतात. त्यातच महिन्याची एकादशीची वारीचे हे व्यावसायिक वाट पाहत असतात. त्या दिवशी सर्वात जास्त विळे विकले जातात.

एका एका दुकानांवर प्रत्येकी दोन ते तीन कारागीर काम करतात. मात्र कोरोनामुळे हे विळे बनविण्याच्या व्यवसायाला ब्रेक लागला होता. सरकारने शेती विषयक दुकानांना आता सूट दिली असली तरी शहरात तालुक्यातील शेतकरी येणे टाळत असल्याने दिवसभरात जेमतेम काही प्रमाणावर विळ्यांची विक्री होते. त्यातच संत ज्ञानेश्वर मंदिर ही बंद असल्याने त्याचाही परिणाम या दुकानांवर झाल्याचे दिसून येते.

घिसाडी म्हंटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते लोखंडी वस्तू बनविणारे, शेतीची लोखंडी अवजारे बनविणे आणि शेतीला लागणारी अनेक प्रकारची हत्यारे बनविणारा माणूस मात्र गेल्या दीड महिन्यापासून याच माणसाच्या हाताला काम नसल्याने उपजीविका भागवायची कशी हा प्रश्न निर्माण झाला आहे. ग्रामीण भागात शेतीसाठी वापरल्या जाणार्‍या पारंपरिक कोळपी यंत्रसारखी अवजारे, विळा, कोयता, खुरपे, कुदळ, टिकाव इत्यादींसारखी साधने मुख्यत्वेकरून शेतकामासाठी वापरण्यात येतात.

घिसाडी समाजाची अनेक कुटुंबे व्यवसायाकरिता शहरी भागात स्थायीक झाली आहेत. पूर्वी हा समाज घोडागाडी घेऊन गावोगावी फिरत असत. परंतु बदलत्या काळानुसार समाजाने यांत्रिकीरणाचा थोडा फायदा घेत तिनचाकी रिक्षा गाडीमध्ये आपल्या व्यवसायाशी निगडीत वस्तू घेऊन ते गावोगावी फिरत असतात. फिरतीचा व्यवसाय असल्याने मुलांना शिक्षण घेता येत नाही. कामधंदा आणि उत्पन्नाचे कुठलेही साधन उपलब्ध नसल्याने फिरुन पोट भरावे लागत असल्याने लहान मुलाच्या शिक्षणाचा प्रश्न देखील निर्माण होता. मात्र आता या व्यवसायात या समाजातील महिलाही काम करत आहे.

सध्या शेती औजारे बनविणे सुरू झाले असले तरी शहरातील बाजारपेठ बंद असल्याने ग्रामीण भागातून खरेदीसाठी अद्याप म्हणावं असा शेतकरी वर्ग शहरात आलेला नाही. या व्यवसायबरोबरच कृषी दुकाने, शेती व्यवसायाशी निगडित सर्वच दुकाने ओस पडल्याचे चित्र शहरात दिसत आहे. करोनाचे मोठे संकट देखील डोळ्यासमोर दिसत असले तरी थोड्याफार प्रमाणात शेतीकडे शेतकरी वळत असल्याने या व्यावसायिकांना पुन्हा एकदा चालना मिळणार हे नक्की आहे.

करोनामुळे शेतकरी नेवासा शहरात शेती अवजारे दुरुस्तीसाठी देखील येत नाहीत. आता करोनाच्या संकटात जे काम भेटलं ते करून उदरनिर्वाह करत आहे.
-रामभाऊ साळुंके विळे व्यावसायिक, नेवासा

- Advertisment -

ताज्या बातम्या