श्रीरामपूर तालुक्यात 19 हजार 623 विद्यार्थ्यांना शिल्लक पोषण आहाराचे वाटप
श्रीरामपूर (प्रतिनिधी)- कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर शासनाने शाळांना सुट्टी जाहीर केलेली आहे. त्यामुळे शिल्लक पोषण आहार पालकांमार्फत विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याबाबत शासनाने आदेश दिले होते. त्यानुसार श्रीरामपूर तालुक्यातील एकूण 161 शाळेतील 20 हजार 63 विद्यार्थ्यांपैकी 19 हजार 623 विद्यार्थ्यांना शिल्लक पोषण आहाराचे वाटप करण्यात आले आहे. सध्याच्या अडचणीच्या कालावधीत विद्यार्थ्यांना मिळालेल्या पोषण आहारातून काहीशी भूक भागली जाणार असल्याने हा पोषण आहार दिलासादायक ठरला आहे.
अवघ्या जगावर सध्या कोरोनाचे संकट आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सरकारने लॉकडाऊन घोषित केला आहे. मार्च महिन्यापासून शाळांनाही पुढील आदेश येऊ पर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या विद्यार्थी घरीच आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना शाळेत दिला जाणारा पोषण आहार वाटपाअभावी शिल्लक राहिल्यास खराब होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या हेतूने शासनाने शाळेमध्ये शिल्लक असलेला पोषण आहार विद्यार्थ्यांना पालकांमार्फत समप्रमाणात वाटप करावा, अशा सूचना दिल्या होत्या.
त्यानुसार संबंधित शाळांनी या पोषण आहाराचे शासन नियमांचे पालन करीत वाटप केले आहे. तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 124, खासगी प्राथ. व खासगी माध्य. 37 अशा 161 शाळेतील 20 हजार 63 विद्यार्थ्यांपैकी 19 हजार 623 विद्यार्थ्यांना या पोषण आहाराचे वाटप केले आहे. यामध्ये हरभरा दाळ, मटकी, तूरदाळ, मूगदाळ, तांदूळ यांचा समावेश आहे. दरम्यान, पोषण आहार वाटपासाठी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक यांच्या योग्य नियोजनामुळे शासन नियमांचे पालन होऊन सर्व शाळेत पालकांमार्फत पोषण आहार वितरीत करण्यात आला.
शाळा संख्या विद्यार्थी संख्या तांदूळ मूगदाळ तूरदाळ मटकी हरभरा
124 11636 57683 2830 2672 5035 4131
37 7987 49467 2498 2816 5089 4185
एकूण 161 19623 107150 5328 5488 10124 8316




