Friday, May 3, 2024
Homeनगरअखेर ‘ते’ वैद्यकीय अधीक्षक श्रीरामपुरात दाखल !

अखेर ‘ते’ वैद्यकीय अधीक्षक श्रीरामपुरात दाखल !

श्रीरामपूर (प्रतिनिधी)- अखेर अहमदनगर येथे क्वारंटाईन करण्यात आलेले श्रीरामपूर येथील ग्रामीण रुग्णालयाचेे वैद्यकीय अधीक्षक मोठ्या पाठपुराव्यानंतर श्रीरामपुरात दाखल झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लक्ष घातल्यानंतर या वैद्यकीय अधीक्षकांना नगरमधून डिस्चार्ज दिला. काल सायंकाळी साडेचार वाजता ते श्रीरामपुरात आले.

नेवासा येथील एका रुग्णास या वैद्यकीय अधीक्षकांनी तपासले होते. मात्र, तो रुग्ण करोना पॉझिटिव्ह निघाल्याने शहरातील दोन मोठ्या डॉक्टरांसह आठ जणांचे घशाचे स्राव तपासण्यासाठी पाठवण्यात आले होते. त्यांचा रिपोर्टही निगेटिव्ह आला. दरम्यानच्या, काळात या वैद्यकीय अधीक्षकांना नगरला क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यानंतर या डॉक्टरांसह अन्य डॉक्टर, नर्स अशा आठ जणांना श्रीरामपुरात क्वारंटाईन केलेले असताना अचानक या वैद्यकीय अधीक्षकांना नगरला रवाना करण्यात आले.

- Advertisement -

वैद्यकीय अधीक्षकांसारख्या ‘अ’ वर्ग अधिकार्‍यास थेट मदरशात क्वारंटाईन करण्यात आले. या प्रकरणावर सर्व बाजूंनी मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. त्यांना पुन्हा श्रीरामपुरात आणण्यासाठी मोठा पाठपुरावाही करण्यात आला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर सूत्र वेगाने फिरले. त्यातच या वैद्यकीय अधीक्षकांचा 14 दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपत आल्याने त्यांची काल महापालिकेच्या डॉक्टरांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण केल्यानंतर त्यांना सोडण्यात आले. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास हे वैद्यकीय अधीक्षक श्रीरामपुरात दाखल झाले.

थेट मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी घातले लक्ष
याप्रकरणी म्हाडाचे नाशिक विभागाचे अध्यक्ष शिवाजी ढवळे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी थेट संपर्क करून त्यांच्यापुढे हा विषय मांडला. तसेच नगराध्यक्षा अनुराधाताई आदिक, अविनाश आदिक यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे या प्रकरणासाठी संपर्क केला. शिवसेनेचे शहर प्रमुख सचीन बडदे यांनी मातोश्री बरोबरच आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याशी तर भाजपाचे प्रकाश चित्ते यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यामुळे या प्रकरणासाठी वरिष्ठ पातळीवरून हालचाली झाल्यानंतर त्यांची पुन्हा श्रीरामपुरात रवानगी करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या