Thursday, July 2, 2026
Homeनगरशेतकर्‍यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करून देणार- ना. भुसे

शेतकर्‍यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करून देणार- ना. भुसे

राहुरी विद्यापीठात ऑनलाईन खरीप पीक संवादाचा समारोप

राहुरी विद्यापीठ (वार्ताहर)- महाराष्ट्रात खरीप हंगामाची तयारी कृषी विभागाने केलेली आहे. खरीप हंगामासाठी लागणारी खते व बियाणे पुरेशा प्रमाणात आहेत. 50 हजार मे. टन युरियाचा बफर स्टॉक सरकार करीत असून शेतकर्‍यांनी यासंदर्भात घाबरण्याचे कारण नाही. शेतकरी बांधवांनी कमी लागवड खर्चात जास्तीत जास्त दर्जेदार शेतमालाची निर्मिती करावी. तयार झालेल्या शेतमालाची विक्री कृषीखात्याच्या सहकार्याने ग्राहकांना घरपोच करण्याच्या दृष्टीने कार्यवाही करण्यात येईल, जेणेकरून शेतकरी बांधवांना त्यांनी पिकविलेल्या शेतमालाचा रास्तभाव मिळेल. शेतकर्‍यांच्या शेतावर बियाणे उपलब्ध करून देणार, आम्ही स्वतः आठवड्यातून दोन दिवस शेतकर्‍यांच्या शेतावर जाऊन शेतकर्‍यांशी संवाद साधणार असे प्रतिपादन राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांनी केले.

- Advertisement -

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी आणि कृषी विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने ऑनलाईन खरीप पीक परिसंवादाचे आयोजन राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठात करण्यात आले. या परिसंवादाच्या समारोप प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा होते.

यावेळी प्रमुख डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एम. भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय सावंत, महाराष्ट्र राज्याचे कृषी आयुक्त डॉ. सुहास दिवसे, कृषी परिषदेचे महासंचालक विश्वजीत माने, अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, डॉ. अशोक फरांदे, डॉ. शरद गडाख, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवाजीराव जगताप, डॉ. पंडित खर्डे, प्रा. माधव देसाई उपस्थित होते.

ना. भुसे म्हणाले, गाव शिवारातील ओढे, नदी, नाले यावर बंधारे बांधण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ. पाट पाणी वाटपाच्या संदर्भात सर्व पाणी वापर संस्थांना सर्व शेतकर्‍यांना समन्यायी वाटप करण्यासंबंधी सांगण्यात येईल. भाडेतत्वावर वापरण्यासाठी प्रत्येक गावासाठी ट्रॅक्टर देऊ, जेणेकरून गावातील सर्व शेतकरी बांधवांना त्या ट्रॅक्टरचा उपयोग होईल. लहान औजारे कुटुबांना पुरविता आली तर त्यांची गुजराण त्याच्यावर होऊन त्यांना फायदा होईल. शेततळ्याच्या अस्तरीकरणासंबंधी लवकरच निर्णय घेऊ. येत्या 10 दिवसात उर्जा विभागाचे नवीन धोरण येत आहे.

त्यामध्ये प्रत्येक शेतकर्‍याला सौरपंप पुरविण्यासंबंधी निर्णय घेऊ असे आश्वासन त्यांनी दिले.  कुलगुरू डॉ. के.पी. विश्वनाथा म्हणाले, यावर्षी विद्यापीठाने शेतकर्‍यांसाठी 1900 क्विंटल बी-बियाणे, 24 लाख फळपिकांची रोपे, 250 क्विंटल जैविक खते, 450 क्विंटल जैविक किटकनाशके विद्यापीठाच्या वेगवेगळ्या विक्री केंद्रांवर उपलब्ध केलेली आहेत. यावर्षी चांगले पर्जन्यमान राहिल, पिकांची परिस्थिती चांगली राहिल व शेतकर्‍यांना त्याचा चांगला फायदा होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी डॉ. सुहास दिवसे, विश्वजीत माने यांनी मनोगत व्यक्त केले.

या ऑनलाईन खरीप पीक परिसंवादाच्या समारोपाच्या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. शरद गडाख यांनी केले. याप्रसंगी मोहोळ, सोलापूर येथील विवेक माने व पलूस, सांगली येथील प्रमोद पाटील या शेतकर्‍यांनी मनोगत व्यक्त केले. या दोन दिवसीय खरीप पीक परिसंवादात डॉ. सुनील कराड, डॉ. एच.टी. पाटील, डॉ. बी.एस. रासकर, डॉ. सतीश जाधव, डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. मधुकर भालेकर या शास्त्रज्ञांनी अनुक्रमे मका उत्पादन तंत्रज्ञान, बाजरी उत्पादन तंत्रज्ञान, ऊस पीक उत्पादन तंत्रज्ञान, द्राक्ष उत्पादन तंत्रज्ञान, डाळिंब उत्पादन तत्रंज्ञान, खरीप भाजीपाला पिके उत्पादन तंत्रज्ञान या विषयांवर शेतकर्‍यांना मार्गदर्शन केले.

सूत्रसंचालन डॉ. पंडित खर्डे यांनी तर आभार डॉ. शरद गडाख यांनी मानले. या दोन दिवसीय परिसंवादात राज्यातून 500 पेक्षा जास्त शेतकरी, कृषी विद्यापीठातील शास्त्रज्ञ, कृषी विभागातील अधिकारी ऑनलाईन सहभागी झाले होते. समन्वयक म्हणून डॉ. बाबासाहेब माळी, डॉ. सचिन सदाफळ, डॉ. भगवान देशमुख, डॉ. संग्राम काळे व प्रा. अन्सार अत्तार यांनी काम पाहिले.

ताज्या बातम्या

गोळीबार

श्रीरामपूरच्या पूर्णवाद नगर परिसरात गोळीबार; तरुण गंभीर जखमी

0
श्रीरामपूर | प्रतिनिधी शहरातील पूर्णवाद नगर परिसरात गुरुवारी सकाळी गोळीबाराची धक्कादायक घटना घडली. या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला प्राथमिक उपचारानंतर पुढील...