नाशिक : शाळा दि.१५ जूनपासून सुरु करण्याच्या हालचाली शिक्षण विभागाने सुरु केल्या आहेत. मात्र, शाळांची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांवर सोपवण्यात येणार आल्याने त्यांनी तीव्र विरोध केला आहे. गट शिक्षणाधिकार्यांनी मुख्याध्यापकांना हमीपत्र देण्याची सक्ती केल्यामुळे मुख्याध्यापक अडचणीत सापडले आहेत.
गट शिक्षणाधिकार्यांनी सोमवारी (दि.८) काढलेल्या पत्रात मुख्याध्यापकांना ११ नियम सांगितले आहेत. त्याधारे शाळेची संपूर्ण जबाबदारी मुख्याध्यापकांनी घेऊन तसे लेखी हमिपत्र शिक्षण विभागाला सादर करण्याचे आदेश दिले आहेत. यात शाळेतील सर्व शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती केली आहे. शाळा सुरू करण्यासाठी ग्राम करोना समिती, शाळा व्यवस्थापन समिती, एसएमडीसीचे ना हरकत प्रमाणपत्रही मिळवावे लागेल.
शाळेत मास्क वापरण्याची बंधनकारक राहणार असून वारंवार हात धुण्यासाठी ‘हॅण्ड वॉश स्टेशन’ सुविधा पुरवण्याची मागणी केली आहे. शाळेचे निर्जंतुकीकरण करणे आवश्यक राहणार असून, शाळेत ताप मोजण्याचे यंत्र वापरण्याची सक्तीही केली आहे. विद्यार्थ्यांची वारंवार आरोग्य तपासणी करण्याचे आदेश देखील दिले आहेत. शालेत पालकांची गर्दी होणार नाही, याची खबरदारी मुख्याध्यापकांनी घ्यायची आहे. या सर्व अटींचे पालन करुन शाळा सुरु करण्याचे निर्देश गट शिक्षणाधिकार्यांनी दिले आहेत.
गट शिक्षणार्यांनी दिलेल्या पत्राच्या आधारे मुख्याध्यापक संघाने शिक्षणाधिकारी डॉ.वैशाली झनकर यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर करत योग्य खूलासा करण्याची मागणी केली आहे. शिक्षण विभाग मुख्याध्यापकांनाच जबाबदार धरते आणि संस्था चालकही. त्यामुळे आरोग्य विभागाने अगोदर शाळेला सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्याची मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे. शाळा सुरु करण्यावरुन वादंग सुरु झाले आहे.




