घोटी : पावसाचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या इगतपुरी तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने चांगलीच हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या पूर्वसंध्येला घोटी इगतपुरी शहरासह जवळपास ग्रामीण भागात सर्वत्र जोरदार पावसाने सलामी दिली. विशेष म्हणजे अवघ्या सहा तासात चक्क १९० मिमी पाऊस झाला. या विक्रमी पावसाने इगतपुरी / घोटी। परिसरात सर्वत्र पाण्याचे ओहळ दिसत होते.
इगतपुरी तालुक्यात अंदाजे जुन अखेरच्या दरम्यान मोसमी पावसाला सुरुवात होते मात्र यावर्षी पावसाने जूनच्या पहिल्याच आठवड्यात जोरदार हजेरी लावल्याने पावसाबाबत दिलासादायक स्थिती निर्माण झाली आहे.
दरम्यान काल सायंकाळी सहा वाजेनंतर इगतपुरी, घोटीसह जोरदार पाऊस झाला रात्री बारा वाजेपर्यंत हा मूसळधार पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या या पावसाने अनेकांची अडचण निर्माण केली. खबरदारीचा उपाय म्हणून काही वेळ विजपुरवठाही खंडीत ठेवण्यात आला होता.
या मूसळधार पावसाने सर्वत्र पाणीच पाणी दिसत होते, गटारी, ओहळ खळखळून वाहत होते. जनजीवन विस्कळीत झाले होते. विशेष म्हणजे अवघ्या सहा तासात विक्रमी पावसाची नोंद झाली. घोटी, इगतपुरीत १९० मिमी पाऊस झाल्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात झालेला हा पाऊस विक्रमी ठरला.
आज दुसऱ्या दिवशीही अधून मधून पावसाच्या सरी सुरूच होत्या. गेल्या चोवीस तासात १९० मिमी नोंद झाली तर आज अखेर ३४६ मिमी पाऊस झाला.




