नवी दिल्ली | New Delhi
उत्तरप्रदेश, पंजाबसह आणखी काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात (Union Cabinet Expansion) मोठ्या फेरबदलाची शक्यता वर्तवली जात आहे. अद्याप सरकारकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नसली, तरी संसदेचे पावसाळी अधिवेशन (Monsoon Session of Parliament) सुरू होण्यापूर्वीच हा विस्तार आणि खात्यांचे फेरवाटप होण्याची दाट शक्यता आहे. या प्रक्रियेमुळे दिल्लीतील राजकीय हालचालींना कमालीचा वेग आला आहे.
या संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारात सर्वात मोठी चर्चा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या नावाभोवती रंगली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी फेरबदलात अमित शाह यांची थेट उपपंतप्रधानपदी नियुक्ती केली जाऊ शकते. सध्या केंद्र सरकार, पक्ष संघटना आणि प्रशासकीय निर्णयप्रक्रियेत अमित शाह हे अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. जर त्यांची उपपंतप्रधानपदी (Deputy Prime Minister) वर्णी लागली, तर भविष्यातील नेतृत्वाबाबत भाजपकडून हा एक मोठा आणि महत्त्वपूर्ण संदेश असेल, कारण भविष्यात मोदींनंतर त्यांच्याकडेच नेतृत्व सोपवले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पक्षाची नवी संघटनात्मक बांधणी आणि मंत्रिमंडळ विस्तार एकाच वेळी!
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपची नवी संघटनात्मक टीम जवळपास तयार झाली आहे. दोन दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजप अध्यक्ष नितीन नवीन यांच्यात एक बैठक झाली. या बैठकीत मंत्रिमंडळ विस्तार आणि पक्षाच्या नव्या टीमबाबत चर्चा झाली. त्यामुळे आता हे दोन्ही निर्णय एकाच वेळी जाहीर होण्याची शक्यता आहे. या फेरबदलात काही विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिपदावरून मुक्त करून पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदार्या दिल्या जाऊ शकतात, तर त्यांच्या जागी नवीन चेहर्यांना संधी मिळण्याची शक्यता आहे.
अनेक मंत्र्यांची गच्छंती, युवा नेत्यांना संधी?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि पेट्रोलियम मंत्री हरदीपसिंह पुरी यांच्यासह अनेक विद्यमान मंत्र्यांच्या खात्यांमध्ये मोठे बदल केले जाऊ शकतात. या फेरबदलात काही विद्यमान केंद्रीय मंत्र्यांना मंत्रिमंडळातून मुक्त करून पक्ष संघटनेत महत्त्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या जाण्याची शक्यता आहे, तर त्यांच्या जागी काही नव्या आणि युवा चेहऱ्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, या संपूर्ण संभाव्य फेरबदलाबाबत अद्याप सरकार किंवा भाजपकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. मात्र, आगामी निवडणुका आणि पक्षांतर्गत फेररचना पाहता, संपूर्ण देशाचे लक्ष आता दिल्लीतील या हालचालींवर आणि होणाऱ्या अधिकृत घोषणेकडे लागले आहे.




