Sunday, May 5, 2024
Homeनाशिककॉलेजरोडला मोबाईलमध्ये रौलेट जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

कॉलेजरोडला मोबाईलमध्ये रौलेट जुगार खेळणाऱ्यांवर कारवाई

नाशिक । मोबाइलमध्ये रोलेट जुगार इस्टॉल करून देत जुगार्‍यांना पैशांच्या मोबदल्यात पॉइंट देणार्‍या संशयितांविरोधात पोलीस आयुक्तांच्या अवैध धंदे कारवाई पथकाने कारवाई केली. कॉलेज रोडवरील एस. के. ओप मॉलच्या तळमजल्यावरील गाळ्यात बुधवारी (दि.18) रात्री ही कारवाई करण्यात आली असून याप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कॉलेज रोडवरील एका दुकानात मोबाइलमध्ये बिंगो, फन रोलेट हे जुगार इन्स्टॉल करून देत जुगार्‍यांना पॉईंट दिले जात असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांना मिळाली. त्यांनी अवैध धंदे कारवाई पथकास कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने यांनी इतर सहकार्‍यांसोबत ही कारवाई केली. त्यात संशयित जोगंंदर उर्फ पप्पु रघुनंदन शहा हे त्याच्या गाळ्यात इंटरनेटच्या माध्यमातून जुगार्‍यांना ऑनलाइन जुगार गेम डाऊनलोड करून देत असल्याचे आढळून आले.

- Advertisement -

तसेच जुगार्‍यांकडून पैसे घेऊन त्यांना पॉइंट दिले जात असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी या ठिकाणाहून 1 लाख 35 हजार रुपयांची रोकड, वाहन, जुगाराचे साहित्य असा एकूण 4 लाख 899 हजार 770 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गाळा मालक शहा याच्यासह राहुल शाहु पटेल, जसविंदर रवींद्र सिंग, किरण साहेबराव ढोकळे, कमलेश अनिरुद्ध मंडल, राकेश शरद जाधव आणि कैलास जोगेंदर शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक कुंदन सोनोने, सहायक पोलीस उपनिरीक्षक विजय शिरसाठ, पोलीस नाइक सारंग वाघ, पोलीस शिपाई गजानन पवार, सूरज गवळी आणि संतोष वाघ यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या