सर्व विषय मंजूर असताना मुख्याधिकार्यांनी दिशाभूल केल्याचे पत्रक केले तयार
मात्र पत्रावर सह्या करण्यास सर्व नगरसेवकांचा नकार
राहाता (तालुका प्रतिनिधी)- राहाता पालिकेतील बंड करणार्या विखे गटाच्या 8 व भाजपाच्या नगरसेवकांना नगराध्यक्षा यांच्या पतीकडून गोंजारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व विषय मंजूर असताना मुख्याधिकारी यांनी दिशाभूल करून वर हात करायला लावले असे पत्रक तयार करून त्या नाराज नगरसेवकांच्या त्यावर सह्या घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या पत्रावर सह्या करण्यास सर्व नगरसेवकांनी नकार दिल्याचे या नगरसेवकांनी सांगितले.
राहाता पालिकेच्या 9 डिसेंबर रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत मागील सर्वसाधारण सभेत झालेले सर्व विषय नामंजूर करण्यात आले होते. 16 विरूध्द 2 मतांनी ते नामंजूर झाल्याने सत्ताधारी नगराध्यक्ष पिपाडा यांना तो मोठा धक्का बसला होता. पिपाडांपासून नाराज झालेले सत्ताधारी गटाचे 8 नगरसेवक व विखे गटाचे 8 नगरसेवक विरोधात गेल्याने मोठी नामुष्की पालिकेत पिपाडा गटाला आली होती. या बंड केलेल्या नगरसेवकांना गोंजारण्याचे काम स्विकृत नगरसेवक राजेंद्र पिपाडा करत आहेत. त्यासाठी त्यांनी माजीमंत्री राधाकृष्ण विखे यांनाही साकडे घातले असून विखेंनीही नगरसेवकांना मदत करण्याचा सल्ला दिला. मात्र सातत्याने पालिकेत होणारा अपमान तसेच या नगरसेवकांचे प्रभागात कोणतेही न होणारे काम व नागरिकांचा या नगरसेवकांवर वाढता दबाव यामुळे हे नगरसेवकांनी चिडून विरोध केला आहे.
9 डिसेंबर रोजी झालेल्या सभेत असे काही घडलेच नाही असे दाखविण्याचा प्रयत्न पिपाडा यांच्याकडून केला जात आहे. त्यासाठी त्यांनी मुख्याधिकार्यांना देण्यासाठी एक निवेदन तयार केले असून मुख्याधिकारी यांनी मागील सर्वसाधारण सभेचे कामकाज अधिकार नसताना त्यांनी चालविले. मुख्याधिकारी ह्या हिंदी भाषीक असल्याने त्यांची भाषा आम्हाला समजली नाही. मुख्याधिकारी यांनी प्रत्येक विषयाला घाई करून हिंदी व इंग्रजी भाषा वापरून आमच्याकडून कोणत्या विषयाला हात वर खाली करून घेतले हे आमचे आम्हालाच कळले नाही. सदरच्या सभेतील विषय आम्ही बहुमताने मंजूर केलेले आहेत.
तसेच यापूर्वी झालेल्या सर्व सभांमधील विषय आम्ही बहुमतांनी मंजूर केलेले आहेत. याबाबत आमची कुठलीही तक्रार हरकत नाही. सभा संपल्यानंतर नगराध्यक्षा निघून गेल्यानंतर मुख्याधिकारी यांनी आमची सही घेतली ती कशाला घेतली हे आम्हाला कळले नाही. त्यामुळे आमच्यात संभ्रम निर्माण झाला. आम्ही कुठलेही कार्यवृत्त नामंजूर केले नाही. सर्व टेंडर प्रक्रीया रद्द करणेबाबत दिलेला अर्ज गैरसमजातून दिलेला आहे.
मागील आठ महिन्यांत सर्वसाधारण सभेत झालेल्या विषयांना आम्ही मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे आमची कोणतीही हरकत नाही. सर्व विषयांना आमची मंजुरी आहे, असे सर्व नगरसेवकांचे नाव असलेले पत्र पिपाडा यांनी विखे गटाच्या नगरसेवकांना देऊन यावर सही करावी. यासाठी विखे यांना साकडे घातले जात आहे. मात्र यावर सही करण्यास विखे गटाच्या सर्व आठ नगरसेवकांनी नकार दिला आहे. या पत्राची कॉपी काल दिवसभर सोशल मीडियावरून फिरत होती. त्यामुळे हे पत्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरले होते.
वेळप्रसंगी आम्ही राजीनामा देऊ; मात्र गैर कारभाराला पाठींबा देणार नाही : नगरसेवक
आम्हाला सदर पत्रावर सही करावी, असे सांगण्यात आले. मात्र हे सर्व अयोग्य असून जे यापूर्वी घडले तेच आम्ही त्या दिवशी सर्व 16 नगरसेवकांनी मुख्याधिकारी यांना सांगून सर्व विषय नामंजूर केले आहेत. आम्ही सर्व नगरसेवक सुशिक्षीत व पदवीधर आहोत. आम्हाला हिंदी व इंग्रजीचे चांगले ज्ञान असून कुणाचे पाप झाकण्यासाठी आम्ही कधीही समर्थन करणार नाही व जनतेशीही गद्दारी करणार नाही. आम्ही फक्त विकास कामांत आ. विखे यांच्या सुचनेवरून साथ देत होतो. गैरकामात मुळीत साथ दिली नाही व देणार नाही. आमच्यावर दबाव आणला तर वेळप्रसंगी आम्ही आमच्या नगरसेवक पदाचा राजीनामा देऊ अशी ठाम भूमिका या नगरसेवकांनी घेतल्याचे नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.
पिपाडा यांच्यातून बाजूला होऊन वेगळा गट केलेले सहा व शिवसेनेचे दोन नगरसेवकही या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे नगराध्यक्षा पिपाडा यांच्या अडचणीत वाढल्या आहेत.