Friday, November 15, 2024
Homeनगर‘साईज्योती’मध्ये पाच दिवसांत पावणे दोन कोटींची उलाढाल

‘साईज्योती’मध्ये पाच दिवसांत पावणे दोन कोटींची उलाढाल

जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले : बचत गटांना मिळणार प्रतिसाद नवा आत्मविश्वास देणारा

अहमदनगर (प्रतिनिधी) – महिला बचत गट चळवळीला प्रोत्साहन व पाठबळ देणारा नगरमधील साईज्योती स्वयंसहाय्यता यात्रा प्रदर्शन उपक्रमाला मिळणारा प्रतिसाद दरवर्षी वाढत आहे. यंदा अकराव्या वर्षी या जिल्हास्तरीय प्रदर्शनात प्रत्येक महिला बचत गटाच्या सरस उत्पादनांना मोठी मागणी राहिली. या प्रतिसादामुळे महिलांचा उत्साह निश्चितच दुणावला असेल. त्यामुळे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी घेतलेले श्रम सार्थकी लागल्याची भावना मनात आहे. आजच्या ब्रॅण्डिंग आणि मार्केटिंगच्या युगात ग्रामीण भागातील महिलाही तितक्याच क्षमतेने आपली गुणवत्तापूर्ण उत्पादने ग्राहकांपर्यंत पोहोचवू शकतात ही गोष्ट साईज्योतीतून सिध्द झाली आहे. येथील अनुभव व पाठबळ महिलांना नवा आत्मविश्वास देणारा ठरेल, असा विश्वास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुले यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

दरम्यान, पाच दिवस झालेल्या प्रदर्शनात महिला बचत गटांची एक कोटी 76 लाख 24 हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या वतीने देण्यात आली. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, जिल्हा परिषदेच्या वतीने नगरला साईज्योती स्वयंसाहाय्यता यात्रा प्रदर्शनाचा सोमवारी सायंकाळी समारोप झाला. या कार्यक्रमास उपाध्यक्ष प्रताप शेळके, राहुरीच्या माजी नगराध्यक्षा उषाताई तनपुरे, जि. प. सदस्य रामभाऊ साळवे, अनिता हराळ जि. प. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, अ‍ॅड. शारदा लगड आदी उपस्थित होते.

मकरसंक्रांतीच्या पार्श्वभूमीवर आयोजित या समारोप सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद पदाधिकारी, महिला अधिकारी, कर्मचारी व महिला बचत गटांच्या सदस्यांचा हळदीकुंकवाचा कार्यक्रम झाला. यावेळी महिला बचत गटांना प्रमाणपत्रांचेही वितरण करण्यात आले.

पाच दिवसांच्या या विक्री प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद मिळाला. बचतगटांनी तयार केलेल्या दर्जेदार वस्तू, उत्पादने सर्वांनाच आवडली. अस्सल ग्रामीण चव आणि स्वाद असलेल्या खानपानाच्या स्टॉलवर तर प्रचंड गर्दी होती. खवय्यांनी सर्व पदार्थांचा मनापासून आस्वाद घेत ग्रामीण भागातील अन्नपूर्णांच्या पाककौशल्याला दाद दिली. यावर्षी सर्व बचत गटांच्या उत्पादनांची एकत्रित मिळून एक कोटी 76 लाखांची विक्री झाली. नागरिकांच्या प्रतिसादामुळे अक्षरश: हातोहात या उत्पादनांची मोठी विक्री झाली.

उत्कृष्ट आयोजन, निवास, भोजन, सुरक्षेच्या चांगल्या उपाययोजनांबद्दल सहभागी महिलांनी समाधान व्यक्त करीत पुढील वर्षी पुन्हा येण्याचा संकल्प करीत साईज्योती प्रदर्शनाचा निरोप घेतला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प अधिकारी परीक्षित यादव, सहायक प्रकल्प अधिकारी तागड, सहायक अभियंता किरण साळवे, लेखाधिकारी आशिष कांबळे, कार्यालयीन अधीक्षक विजय चौसाळकर, सहायक लेखाधिकारी स्मिता बिचके, प्रवीण वाळके, संतोष भराट, आदिनाथ आव्हाड, मंजुषा धीवर, शीतल साठे, मनीषा शिंदे, भूषण मावळ, श्याम लोंढे, सचिन कर्डिले आदीसह अन्य अधिकारी व कार्मचार्‍यांनी परिश्रम घेतले. यावेळी अधिकारी, कर्मचार्‍यांचा अध्यक्षा घुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन उद्धव काळापहाड यांनी केले. आभार किरण साळवे यांनी मानले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या