गटविकास अधिकार्यांसह नऊ जण तपासणीसाठी रवाना
शेवगाव (तालुका प्रतिनिधी) – येथील पंचायत समितीच्या एका शाखा अभियंत्यास शारीरिक त्रास होऊ लागल्याने औरंगाबाद येथील एका खासगी रुग्णालयात ते तपासणीसाठी गेले असता त्यांचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. पंचायत समितीच्या अभियंत्यास करोनाची लागण झाल्याने शहर व तालुक्यातील नागरिकांनी धसका घेतला आहे.
संबंधित अधिकारी औरंगाबाद येथून कार्यालयात कामकाज करण्यासाठी ये जा करत असल्याची चर्चा असली तरी काहींच्या मते ते शहरामध्ये भाडोत्री खोली घेऊन राहत होते. त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांनी औरंगाबाद येथे उपचार घेतले. तेथेच त्याची तापसणी करण्यात आली असून करोना पॉझिटीव्ह अहवाल आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉ. सलमा हिराणी यांनी दिली.
संबंधित अभियंत्याच्या संपर्कात आलेल्या नऊ जणांना अहमदनगर येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. त्यामध्ये गट विकास अधिकार्यांचाही समावेश आहे. पंचायत समितीत विविध कामानिमीत्त नागरिकांची रोज वर्दळ असते. अभियंताच पॉझिटीव्ह निघाल्याने या कार्यालयात येऊन गेलेल्या नागरिकांमध्ये भीती पसरली आहे. दरम्यान तहसीलदार अर्चना भाकड यांनी नगरपरिषदचे मुख्याधिकारी अंबादास गर्कळ यांना तात्काळ पंचायत समिती इमारत निर्जंतुकीकरण करण्यास सांगितल्याने संपूर्ण इमारत व परिसरात औषध फवारणी करण्यात आली.




