Thursday, May 2, 2024
Homeनगररस्ता दुरुस्तीनंतर अवघ्या 15 दिवसांत उखडली खडी !

रस्ता दुरुस्तीनंतर अवघ्या 15 दिवसांत उखडली खडी !

उंबरगाव-मातापूर रस्त्याचे काम निकृष्ट; रस्ता पाहणी करण्याची नागरिकांची मागणी

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – अनेक वर्षांपासून रखडलेल्या उंबरगाव ते मातापूर या रस्ता दुरुस्तीच्या कामाला महिन्यापूर्वी मुहूर्त मिळाला. मात्र रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याने अवघ्या 15 ते 20 दिवसांतच रस्त्यावरील खडी उखडल्याचे चित्र आहे. त्यामुळे या निकृष्ट रस्त्याबाबत या भागातील नागरिकांनी थेट जिल्हा परिषदेचे डेप्युटी इंजिनियर यांच्याशी संपर्क साधून पाहणी करण्याची मागणी केली. मात्र त्यांनीही पाहणी करण्याचे आश्वासन देऊन अद्याप ती न केल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

उंबरगाव ते मातापूर चौकी हा रस्ता अनेक वर्षापासून दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होता. यासाठी अनेकवेळा या भागातील नागरिकांनी मागणी व पाठपुरावा केला. अखेर काही महिन्यांपूर्वी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले व पंचायत समिती सदस्या संगीताताई गांगुर्डे यांच्या स्थानिक विकास निधीतून या रस्त्याच्या मजबुतीकरणाच्या कामाला मंजुरी मिळून पावसाळ्यात त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर काही महिन्यांनंतर रस्ता दुरुस्तीच्या कामास सुरुवात झाली. सुरुवातीला खडी व मुरूम टाकून रस्त्यावर पाणी टाकून खडी दाबण्यात आली.

त्यानंतर मागील आठवड्यात या रस्त्यावर खडी टाकून डांबर टाकण्यात आले. मात्र संबंधित ठेकेदाराने या रस्त्याच्या कामासाठी अत्यंत कमी प्रमाणात डांबराचा वापर केला. त्यामुळे रस्ता दुरुस्तीनंतर अवघ्या पंधरा दिवसांत खडी उघडी पडली. त्यामुळे रस्त्यावरून जाणार्‍या नागरिकांना त्याचा मोठा त्रास होत आहे. या रस्त्यावर खडी पूर्णपणे उघडी पडली आहे. त्यामुळे वाहन धारकांना वाहन चालवताना मोठी कसरत करण्याची वेळ आली आहे. तर अनेक नागरिक घसरुन पडल्याच्याही घटना घडल्या आहे.

या रस्त्यावरून शेतकर्‍यांसह विद्यार्थी, व्यावसायिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. अनेक वर्षानंतर दुरुस्ती झालेला रस्ताही अडचणीचा ठरत असल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या रस्त्याची संबंधित ठेकेदाराकडून त्वरित दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे. अन्यथा बेलापूर-पढेगाव रोडवर कोणतीही पूर्वसूचना न देता रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे चंद्रकांत उंडे यांच्यासह या भागातील नागरिकांनी दिला आहे.

डेप्युटी इंजिनियरचे फक्त आश्वासनच !
सदर रस्त्यावरील खडी उघड पडली आहे. त्यामुळे याबाबत जिल्हा परिषदेचे डेप्युटी इंजिनियर श्री. इवळे यांच्याशी संपर्क साधून रस्त्याची पाहणी करावी, अशी मागणी केली होती, त्यावर त्यांनी मंगळवारी रस्त्याची पाहणी करतो, असे आश्वासन दिले होते. मात्र आठ ते दहा दिवस होऊनही अद्याप त्यांनी पाहणी केलेली नाही.
-राहुल उंडे, प्रगतिशील शेतकरी.

- Advertisment -

ताज्या बातम्या