टाकळीभानला आजपासून दोन दिवस पूर्ण अंमलबजावणी
सवर्र् व्यवहार बंद; विनाकारण रस्त्यावर फिरणार्यांवर होणार कारवाई
टाकळीभान (वार्ताहर)- कोरोनाने देशभर थैमान घातले असतानाच श्रीरामपूर तालुक्यातही कोरोनाचे खाते उघडले गेल्याने संपूर्ण श्रीरामपूर तालुकाच खडबडून जागा झाला आहे. कोरोनाचा प्रादूर्भाव आपल्या गावाला होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी टाकळीभान ग्रामस्थांनी गावाच्या सिमा सील करुन गावातील सर्व व्यवसाय बंद ठेवून नागरिकांनी घरातच थांबून कडकडीत दोन दिवस लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना विषाणूने जगभर थैमान घातले असले तरी तो आपल्यापर्यंत पोहचलेला नाही. या भावनेने सरकारने जाहीर केलेल्या संचारबंदी आदेशाला अनेकांकडून तिलांजली देत रस्त्यावर फिरणे सुरुच होते. मात्र आता श्रीरामपूर तालुक्यातच कोरोना बाधित रुग्ण सापडल्याने तालुक्यातील नागरिकांची पाचावर धारण बसली आहे. कोरोना बाधीत रुग्णाच्या गावालगतच्या गावांनीही चांगलीच धास्ती घेतल्याने ग्रामस्थांनी पुढाकार घेत आपआपली गावे संपूर्ण लॉकडाऊन केली आहेत.
त्याच पार्श्वभूमीवर तालुक्याच्या पूर्वभागातील व लोकसंख्येने मोठ्या असलेल्या टाकळीभान ग्रामस्थांनीही आजपासून सर्व व्यवसाय बंद ठेवून कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी गावातील व्यक्ती बाहेर जाऊ नये व बाहेरचा व्यक्ती गावात येऊ नये यासाठी कारेगाव, मुठेवाडगाव, घुमनदेव, घोगरगाव, बेलपिंपळगाव, खिर्डी, वांगी, गुजरवाडी या गावांच्या सिमा बंद करण्यात येणार आहेत.
गावातील किराणा, कृषीसेवा, भाजीपाला, मटन व इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात येणार आहे. दूध केंद्र चालकांनी सकाळी आठ वाजेपर्यंत दूध संकलन गर्दी न करता करुन घेणे व दूध उत्पादकांनी लगेच घरी जावे. सकाळी आठ नंतर विनाकारण रस्त्यावर दुचाकी फिरणार नाहीत याची दक्षता घेणे व तरीही आढळल्यास पोलीस प्रशासनाला गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
यासाठी स्थानिक तरुणांनी पुढाकार घेतला असून येते दोन दिवस हे तरुण गावच्या सिमेवर व प्रत्येक प्रभागावर लक्ष ठेवून असणार आहेत व कोरोना बाबत जनजागृती करुन लॉकडाऊन कालावधीत घरातच बसून रहाण्याचे आवाहन करणार आहेत. त्यामुळे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळला जाणार असल्याने लॉकडाऊन कालावधीत सरकारने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. टाकळीभान ग्रामपंचायतीकडून ध्वनीक्षेपकाद्वारे प्रचार करुन खबरदारीचे आवाहन करण्यात येत आहे.
गावाला कोरोनाचा धोका टाळण्यासाठी सर्व तरुण एकवटले आहेत. त्यामुळे दोन दिवस कडकडीत लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नाकेबंदीसाठी तरुणांनी पुढाकार घेतलेला आहे. सर्व तरुण कोरोनापासून ग्रामस्थांचे संरक्षण करण्यासाठी एकत्र आल्याने ग्रामस्थांनीही त्यांना सहकार्य करावे व कोरोनाला हद्दपार करण्यासाठी मोलाची भूमिका बजवावी.
– राहुल पटारे, माजी अध्यक्ष, टाकळीभान सोसायटी
कोरोनाचे महासंकट आता थेट आपल्या उंबरठ्यावर येवून ठेपले आहे. त्यामुळे बाहेर जाणे टाळा व बाहेरुन येणारांनाही रोखा. आपल्या शेजारी बाहेर गावावरुन आलेल्या पाहुण्यांची माहिती आरोग्य केंद्राला व ग्रामपंचायतीला द्या. विनाकारण रोडवर दुचाकीवर फिरणारांना आता पोलिसांच्या स्वाधीन करुन बदडून काढले जाईल. सरकारच्या व प्रशासनाच्या सूचनांचे पालन करुन लॉकडाऊन कालावधीत घरातच थांबा व कुटूंबाचे संरक्षण करा. कोरोनाला रोखा.
– नानासाहेब पवार, माजी सभापती, कृ.उ.बा.श्रीरामपूर.




