Sunday, May 5, 2024
Homeनगरश्रीरामपूर : दत्तनगर येथील जळीत तरुणाचा 28 तासानंतर अंत्यविधी

श्रीरामपूर : दत्तनगर येथील जळीत तरुणाचा 28 तासानंतर अंत्यविधी

आ. कानडे यांची मध्यस्थी तर डॉ. काळेंच्या ठोस आश्वासनानंतर तरुणाचा अंत्यविधी

टिळकनगर (वार्ताहर) – रमजान ईदच्या दिवशी श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर येथील नदीम अन्सार पठाण या विवाहित तरुणाने पोलीस चौकीसमोर स्वतःला पेटवून घेतले होते. त्यात तो गंभीर भाजला होता. उपचारादरम्यान गुरुवारी चारच्या दरम्यान नदीमचा दुर्दैवी मृत्यू झाला. नातेवाईकांनी नदीमच्या मृत्यूची चौकशी करून मृत्यूस कारणीभूत असलेल्या पोलिसांवर गुन्हा दाखल करावा, असा आक्रमक पवित्रा घेत मयत नदीमचा अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने परिसरात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली होती.

- Advertisement -

मात्र आ. लहू कानडे यांच्या मध्यस्थीने व अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्या ठोस आश्वासनानंतर तब्बल 28 तासानंतर मयत नदीमचा अंत्यविधी कडेकोट पोलिस बंदोबस्तात काल रात्री नऊच्या दरम्यान करण्यात आला.

आ.लहू कानडे, उपनगराध्यक्ष करण ससाणे, पंचायत समितीच्या सभापती संगीता शिंदे, ज्ञानेश्वर मुरकुटे, सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे अहमद जहागीरदार, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे, राहुरी पालिकेचे माजी उपनगराध्यक्ष इस्माईल सय्यद, रिपाईचे भिमराज बागुल, राजाभाऊ कापसे, सरपंच सुनील शिरसाठ, माजी उपसरपंच नानासाहेब शिंदे, भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर, सागर भोसले, सरपंच चांगदेव ढोकचौळे, पोलीस पाटील सुनील गायकवाड, कृष्णा अभंग, प्रेमचंद कुंकलोळ, समाजवादी पार्टीचे जोएब जमादार, आदिल मखदुमी, बबलू शाह यांनी नदीमच्या घरी भेट देऊन चौकशी करून कारवाई करण्याची मागणी पोलिसांकडे लावून धरली.

आ. कानडे यांनी पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट व पोलीस उपअधीक्षक राहुल मदने यांना संबंधित प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितले. मात्र पोलीस प्रशासनाने याबाबत असमर्थता दाखविल्याने आ. कानडे आणि पोलीस प्रशासनाच्या या अधिकार्‍यांना चांगलेच धारेवर धरीत याबाबत जाब विचारला व त्यानंतर आ. कानडे यांनी जिल्हा पोलीस प्रमुख यांना घटनेचे गांभीर्य समजावून सांगितले व घटनेचे गांभीर्य लक्षात घेताच जिल्हा पोलीस प्रमुखांनी तात्काळ घटनास्थळी काही पोलीस अधिकार्‍यांचा ताफा पाठवून अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांना तात्काळ घटनास्थळी पाठवून योग्य कारवाई करण्याचे निर्देश दिले. पोलीस अधिक्षक डॉ. दीपाली काळे यांनी मयत नदीमच्या घरी भेट देत प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषी पोलीस कर्मचार्‍यांवर लगेचच कारवाई करण्याचे ठोस आश्वासन देत मयत नदीमच्या आईचा जवाब नोंदवून पुढील कारवाईस जलदगतीने सुरुवात केली.

संध्याकाळी सहाच्या सुमारास मयत नदीमचा मृतदेह लोणी रुग्णालयातून आणण्यात आला. अंत्ययात्रेला सुरुवात होताच ज्या पोलीस चौकीसमोर मयत नदीमने स्वतःला पेटवून घेतले होते. त्याच ठिकाणी नातेवाईकांनी अंत्ययात्रा थांबवत मयत नदीमचा मृतदेह चौकीसमोर ठेऊन दिल्याने परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. काहींनी मध्यस्थी करित काही मिनिटातच अंत्ययात्रा पुढे नेत रांजणखोल येथील कब्रस्थान येथे अंत्यविधी करण्यात आला. अंत्ययात्रेदरम्यान संपूर्ण परिसरात पोलीस छावणीचे रूप आले होते.

नदीमचा श्वास थांबला तपास थांबू देऊ नका..!
याप्रकरणी टिळकनगर पोलीस चौकीच्या कर्मचार्‍याच्या जाचास कंटाळून स्वतःला पेटवून घेतल्याचा आरोप मयत नदीम यांच्या नातलगांनी केला आहे. एकुलता एक असलेला मयत नदीमच्या आईनी नदीमचा श्वास थांबला तपास थांबू देऊ नका..! अशी भावुक विनवणी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. दीपाली काळे यांच्याकडे केली. याप्रकरणी सखोल चौकशी करून या पोलीस कर्मचार्‍यास तात्काळ निलंबित करून कठोर कारवाई करण्याची मागणी नदीमच्या आईसह नातलगांनी केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या