Tuesday, May 7, 2024
Homeनगरपावणे चार हजार ऊस तोडणी कामगार घरी परतले !

पावणे चार हजार ऊस तोडणी कामगार घरी परतले !

सरपंचांच्या दाखल्यावर गावात स्वतंत्र 14 दिवसांसाठी क्वारंटाईन

अहमदनगर (प्रतिनिधी)- राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातार यासह अन्य ठिकाणी जिल्ह्यातील साडेचार हजार ऊस तोडणी कामगार गेल्या महिनाभरापासून अधिक काळ अडकले होते. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने निर्णय घेतल्यानंतर राज्यातील विविध भागातून नगर जिल्ह्यात 3 हजार 648 ऊस तोडणी कामगारांना जिल्ह्यात दाखल करून घेण्यात आले आहे.

- Advertisement -

दरवर्षी नगर, बीड या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात ऊस तोडणीसाठी मजूर जात असतात. साधारणपणे राज्यात मार्च महिन्यांपासून गाळप हंगाम आटोपण्यास सुरूवात होते. मात्र, यंदा 20 मार्चनंतर राज्यातील विविध जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने लॉकडाऊन करण्यात आला. या लॉकडाऊनचा फटका ऊसतोडणी कामगारांना बसला. पोटापाण्यासाठी जिल्हा सोडून अन्यत्र गेलेले हे कामगार बायका पोरांसह त्या त्या जिल्ह्यात अडकून पडले.

यामुळे सरकारने आदेश काढत या ऊसतोडणी कामगारांसाठी संबंधीत कारखान्यांने निवारागृह सुरू करून त्यांना ठिकाणी ठेवण्यास सांगितले. मात्र, महिनाभरानंतर लॉकडाऊन उघड होणार नसल्याने आणि करोनाचा प्रकोेप वाढत असल्याने अखेर राजकीय नेत्यांच्या पुढाकारामुळे आणि राज्य सरकारने निर्णय घेतल्याने गेल्या आठ ते दहा दिवसांपासून हे ऊसतोडणी कामगार त्यांच्या जिल्ह्यात परतत आहेत.

जिल्ह्यातील 4 हजार 460 ऊस तोडणी कामगार अन्य जिल्ह्यात अडकले होते. या सर्वांना आता जिल्ह्यात प्रवेश मिळण्यास सुरूवात झाली. जिल्ह्याच्या हद्दीत दाखल झाल्यावर संबंधीत गावात पोहचल्यावर त्या ठिकाणी सरपंच यांच्या दाखल्यानुसार या कामगारांना गावातील प्राथमिक शाळेत 14 दिवस क्वारंटाईन करण्यात येत आहे. त्यांनतर संबंधीतांना त्यांच्या घरी सोडण्यात येणार आहेत.

असे आहेत जिल्ह्यात दाखल कामगार
जामखेड 713, शेवगाव 506, पाथर्डी 1935, नगर 118, राहुरी 105, कर्जत 26, नेवासा 144, श्रीगोंदा 8, श्रीरामपूर 21, राहाता 12, संगमनेर 39, कोपरगाव 5, अकोले 7, पारनेर 9 एकूण 3648 आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या