अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
‘तुमच्या हॉटेलच्या पाठीमागे झालेल्या फायरिंगच्या मॅटरमध्ये तुझ्या भावाला नगर एलसीबी ऑफीसला घेऊन चाललो आहे. त्यात त्याला आरोपी करायचे नसेल तर दोन लाख रूपये घेऊन ये आणि तुझ्या भावाला घेऊन जा’ असे म्हणून एलसीबीतील पोलीस अंमलदाराने सावळीविहीर (ता. राहाता) येथील हॉटेल व्यावसायिकाकडे तडजोडीअंती दीड लाख रूपये लाचेची मागणी केल्याचे लाचलुचपत विभागाच्या कारवाईतून निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी येथील भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात लाच मागणी केल्याप्रकरणी काल, बुधवारी गुन्हा दाखल झाला आहे. संदीप विनायक चव्हाण असे गुन्हा दाखल झालेल्या अंमलदाराचे नाव आहे.
एलसीबीतील चुकीच्या कारभाराविरोधात येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर खासदार नीलेश लंके यांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. बुधवारी त्यांच्या उपोषणाचा तिसरा दिवस होता. त्याच दिवशी एलसीबीतील अंमलदार चव्हाण विरोधात लाच मागणीचा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, अंमलदार चव्हाण याला एलसीबीमध्ये पाच वर्ष पूर्ण झाल्याने त्याची गेल्या शनिवारीच प्रशासकीय बदली दहशतवाद विरोधी पथकात करण्यात आली असून त्याला मंगळवारी एलसीबीतून कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यानंतर त्याच्याविरूध्द लाच मागणीचा गुन्हा दाखल झाला आहे. लाच मागणी पडताळणीची कारवाई मार्च 2024 मध्येच झाली आहे. फिर्यादी यांचे शिर्डी येथे हॉटेल असून त्या हॉटेलच्या पाठीमागील भागातील पार्किंगमध्ये 21 मार्च 2024 रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास दोन जणांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार (फायरिंग) झाला होता.
त्या दिवशी रात्री साडेनऊ वाजता फिर्यादी व त्यांचा भाऊ हॉटेलमध्ये असताना साध्या वेशातील पोलीस तेथे आले व त्यांनी फिर्यादीच्या भावाला वाहनात बसून नेले. रात्री साडेअकरा वाजता फिर्यादीला संदीप चव्हाण याने फोन करून तुमच्या हॉटेलच्या पाठीमागे झालेल्या फायरिंगच्या मॅटरमध्ये तुझ्या भावाला नगर एलसीबी ऑफीसला घेऊन चाललो आहे. त्यात त्याला आरोपी करायचे नसेल तर दोन लाख रूपये घेऊन ये आणि तुझ्या भावाला घेऊन जा’ असे म्हणून लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात फिर्यादी यांनी नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. या पथकाने 22 मार्च 2024 रोजी एलसीबी ऑफीस येथे केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान अंमलदार चव्हाण याने फिर्यादीकडे दोन लाख रूपये लाचेची मागणी करून तडजोडीअंती दीड लाख रूपये घेण्याचे पंचासमक्ष मान्य केल्याचे सिध्द झाले होते.
दरम्यान, अंमलदार चव्हाण याला संशय आल्याने त्याने फिर्यादीकडून पैसे घेतले नाही. लाचलुचपत विभागाने बुधवारी कारवाई करून अंमलदार चव्हाण विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास लाचलुचप प्रतिबंधक विभाग करत आहे.